चार वर्षांनंतरही दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीतच; अलिबाग तहसीलदारांच्या कारभाराबाबत नाराजी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महसूल विभागाकडूनच पाटील आडनावाच्या जागी म्हात्रे अशी चुकीची नोंद होऊन पंधरा वर्षे उलटली. ही नोंद दुरुस्त करण्यासाठी वयोवृद्ध शेतकरी गेल्या चार वर्षांपासून अलिबाग तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या अर्जाची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने वयोवृद्ध शेतकऱ्याला महसूल विभागाच्या कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे अलिबाग तहसीलदारांच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.
पांडुरंग रामभाऊ पाटील (74) असे या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव असून, ते अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथील रहिवासी आहेत. सुडकोली परिसरात त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांच्या वडिलांच्या इतर मिळकतीवर रामभाऊ कमळू पाटील अशी नोंद आहे. मात्र, गट नं. 846 आणि 678 या मिळकतीवर गट स्कीम योजना अर्थात एकत्रीकरणानंतर चुकीने रामभाऊ कमळू म्हात्रे असे आडनाव नमूद करण्यात आले आहे.
गेल्या पंधरा वर्षांपूर्वी महसूल विभागाकडूनच ही चुकीची नोंद झाल्याचा आरोप पांडुरंग पाटील यांनी केला आहे. या नोंदीची दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी 19 सप्टेंबर 2022 रोजी अलिबाग तहसीलदार कार्यालयात कागदपत्रांसह अर्ज केला. प्रशासनाकडून झालेल्या चुकीच्या नोंदीचा फटका या शेतकऱ्याला बसत असून, गेल्या चार वर्षांपासून ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
दुरुस्तीसाठी गेल्या चार वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही अद्याप न्याय मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीचा त्रास वयोवृद्ध शेतकऱ्याला अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे. मात्र, या प्रकरणाची तहसीलदारांकडून दखल घेतली जात नसल्याने महसूल विभागाच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
गट स्कीम योजनेनंतर अर्थात एकत्रीकरणानंतर नजरचुकीने रामभाऊ कमळू म्हात्रे अशी सातबाऱ्यावर नोंद झाली आहे. रामभाऊ कमळू पाटील ही दुरुस्ती करण्यासाठी अलिबाग तहसील कार्यालयात कागदपत्रांसह अर्ज केला आहे. गेल्या चार वर्षांपासून तहसील कार्यालयात चपला झिजवत आहे. परंतु, अजूनपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही.
पांडुरंग रामभाऊ पाटील,
शेतकरी
संबंधित शेतकऱ्यांचा फेरफार बघून तातडीने कार्यवाही केली जाईल.
विक्रम पाटील,
तहसीलदार, अलिबाग
