| जळगाव | वृत्तसंस्था |
शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना सोमवारी (दि.12) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. याच दिवशी बदलापूर येथील शाळेतील मुलीवर अत्याचाराचा प्रकार समोर आला होता.
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका शाळेमागील कॉलनीत पीडित मुलगी कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पीडित मुलगी संशयित सिद्धार्थ वानखेडे याच्या मुलांसोबत लपाछपी खेळत होती. अर्धा-पाऊण तासापर्यंत मित्र- मैत्रिणींसोबत खेळताना सायंकाळ झाली.दरम्यान, खेळताना पीडित मुलगी लपण्यासाठी संशयित सिद्धार्थ वानखेडे याच्या घरात शिरली. मुलीने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित सिद्धार्थने तिचे तोंड दाबून अंगलट करून तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेच्या अंगावर जखमावेदनेने विव्हळत पीडितेने आरडाओरड करून त्याच्या हातावर आणि अंगावर नखांनी ओरखडले. याचा राग येऊन संशयित सिद्धार्थ वानखेडे याने चिमुरडीला धमकावत जर कुणाला सांगितले तर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिल्याचे पीडितेच्या आईने केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी ‘पोक्सो’ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले तपास करीत आहेत.