लखनौकडून लाजिरवाणा पराभव
। मुंबई । प्रतिनिधी ।
पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएल मोसमात सपाटून मार खावा लागत आहे. लखनौ सुपर जायंटस्ने मंगळवारी झालेल्या लढतीत मुंबई संघावर चार बळी राखून विजय मिळवला. लखनौचा हा सहावा विजय ठरला. तर, मुंबईला सातव्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संघाचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या हंगामात आतापर्यंत मुंबई संघाने 10 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 7 हरले असून 3 सामने जिंकले आहेत. आता ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचण्याच्या मुंबईच्या आशांना सुरुंग लागला आहे.
मुंबईकडून लखनौसमोर 145 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. नुआन तुषाराच्या गोलंदाजीवर अर्शिन कुलकर्णी शून्यावर बाद झाला; पण त्यानंतर कर्णधार के. एल. राहुल (28 धावा) व मार्कस स्टॉयनिस (62 धावा) यांनी लखनौसाठी 58 धावांची भागीदारी रचली; पण राहुल, स्टॉयनिस व दीपक हूडा (18 धावा) हे बाद झाल्यानंतर अॅश्टन टर्नर व आयुष बदोनीलाही अपयश आले. अखेर निकोलस पूरन (नाबाद 14 धावा) व कृणाल पंड्या (नाबाद एक धाव) यांनी लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी मुंबईच्या फलंदाजांकडून सपशेल निराशा झाली. इशान किशन (32 धावा), नेहल वधेरा (46 धावा) व टीम डेव्हिड (नाबाद 35 धावा) यांनी थोडीफार चमक दाखवल्यामुळे मुंबईला सात बाद 144 धावांपर्यंत मजल मारता आली. मोहसिन खानने दोन, तर मयंक यादव, नवीन उल हक, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
पांड्यासह मुंबई संघांवर कारवाई या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या आहेत. या संघाला आता प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. सामना गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यासह मुंबई संघांवर बीसीसीआयने मोठी अॅक्शन घेतली आहे. आणि आता पांड्यावर एका सामन्यावर बंदी घातली जाण्याचा धोका आहे. सामन्यात मुंबई इंडियन्स संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला होता. यानंतर बीसीसीआयने संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. याआधी एकदा मुंबईचा संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला होता. आता दुसर्यांदा हार्दिकला दंड ठोठावण्यात आला आहे. केवळ हार्दिक पांड्याच नाही तर संपूर्ण संघातील खेळाडूंना शिक्षा झाली आहे. हार्दिक व्यतिरिक्त संघातील इतर खेळाडूंना 25-25 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई पुन्हा तिसर्यांदा दोषी आढळल्यास कर्णधार हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.