| सुकेळी | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणार्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 2 ते 3 वर्षांपासून घंटागाडीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणार्या गावांमध्ये सर्वत्र कचर्याचे साम्राज्य पसरले आहे.
काही वर्षापूर्वी शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाचा भाग म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये घंटागाडी सुरू करण्यात आली होती. परंतु, सर्वच ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडीची सुविधा ही व्यवस्थितरीत्या सुरु असतांना जवळपास 2 ते 3 वर्षांपासून ऐनघर ग्रामपंचायतमधिल घंटागाडी ही कुठल्याही गावात कचरा जमा करण्यासाठी फिरत नाही. याबाबतीत अनेक वेळा सरपंच तसेच ग्रामसेवकांशी विचारणा केली असता कधी घंटागाडीमध्ये बिघाड झाला आहे, तर कधी डंपिंग ग्राऊंडची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे घंटागाडी बंद ठेवण्यात आली आहे अशी वारंवार उत्तरे देण्यात आली. त्यामुळे पंचायतीमधील प्रत्येक गावांमधील महिलांपुढे कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे ऐनघर ग्रामपंचायतीमधील प्रत्येक गावात कचर्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसुन येत आहे.
ग्रामपंचायतीमध्ये नविन घंटागाडीचा प्रस्ताव घेण्यात आला असून लवकरच नविन घंटागाडी उपलब्ध करण्यात येईल. डम्पिंग ग्राऊंडची देखिल व्यवस्था उपलब्ध करुन घंटागाडी सुरू करण्यात येईल.
सरपंच कलावती कोकळे