। सुकेळी । वार्ताहर ।
जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सर्वच डोंगरांमध्ये वणव्यांचे प्रमाण दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. वाकण, सुकेळी खिंड, खांब, भिसे खिंडीमधील डोंगरांमध्ये वणव्यांचे प्रमाण वाढत चालले असुन याबाबतीत वनअधिकार्यांसह शासकीय प्रशासनाचे याबाबतीत दुर्लक्ष व निष्काळजीपणा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याचे जाणवत आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक डोंगरांमध्ये वणवे लावल्यामुळे ते वार्याच्या प्रचंड वेगाने पसरून जंगलातील पाळा-पाचोळा आणि सुकलेल्या झाडी पेट घेत आहेत. या वणव्यात नैसर्गिक वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत असुन वन्य प्राण्यांना देखिल आपल्या जिवाला मुकावे लागत आहे. रोहा तालुक्यातील सुकेळी, खांब, भिसे खिंड, बाळसई परिसरामध्ये सर्वच डोंगर वणव्यांच्या भक्षस्थानी गेले आहेत. याच परिसरामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढण्याचे नक्की कारण काय? अशा प्रतिक्रिया नागरीकांमधुन उमटत आहेत.