। जम्मू- काश्मिर । वृत्तसंस्था ।
जम्मू -काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. शिवगढ धार भागात ही घटना घडली असून हेलिकॉप्टरमध्ये दोन जण असल्याची माहिती मिळत आहे. उधमपूर परिसरात जास्त धुक्यामुळे परिसरातील दृश्यमानता कमी झाली आहे, ज्यामुळे अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस बचावकार्यासाठी पोहोचले आहेत.
उधमपूरचे पोलीस उपमहानिरीक्षक सुलेमान चौधरी यांनी सांगितले की, पोलिसांना हेलिकॉप्टर कोसळ्याची माहिती मिळाली आणि शिवगड धारमध्ये घटनास्थळाकडे पथके रवाना करण्यात आली आहेत. या भागात धुक्याचं प्रमाण जास्त असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून दोन जखमी लष्करी जवानांना बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
खराब हवामानामुळे लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हे हेलिकॉप्टर कोसळले की पायलट क्रॅश-लँड झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पायलट आणि सह-पायलट दोघेही जखमी झाले आहेत. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी जम्मू -काश्मीरच्या कठुआ येथील रणजीत सागर धरणाजवळ भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली होती. 254 आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रनचे हेलिकॉप्टर सकाळी 10 वाजून 20 मिनीटांनी मामून कँटमधून उडाले आणि रणजीत सागर धरण परिसरात कमी उड्डाण करत असताना कोसळले होते.