रेवदंडा गोळा स्टॉपवरील खड्डा अपघाताला आमंत्रण

संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड-अलिबाग रस्त्यावर रेवदंडा गोळा स्टॉपवरील गेल्या अनेक दिवसांपासून पडलेला खड्डा अपघाताला आमंत्रण देत आहे. दुचाकीस्वारांना यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत असून याकडे संबंधित ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या असलेल्या दुर्लक्षाबाबत वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या रस्त्यावर मुरुड व अलिबाग तसेच गोळा स्टॉपवरुन समुद्र किनारी ये-जा करण्यात रेलचेल असते. या ठिकाणी असलेला खड्डा पावसाचे पाणी भरल्यावर अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले असून वेळप्रसंगी या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायतीने यात लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून जोर धरीत आहे.

Exit mobile version