सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
| कोर्लई | वार्ताहर |
साळाव-मुरुड रस्त्यावर नांदगाव हायस्कूलनजीक असलेल्या मोरीचे संरक्षक कठडे पाईप तुटून पार दुरवस्था झालेली आहे. याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत असून, तातडीने मोरी दुरुस्तीची मागणी वाहनचालक व नागरिकांतून जोर धरीत आहे.
मुरुडला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून साळाव-मुरुड रस्त्यावर कोर्लई, काशिद बीच तसेच मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांच्या विशेष करून शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी अनेक वेळा ट्रॅफिक जॅमला सामोरे जावे लागत असून, त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर नांदगाव हायस्कूलनजीक असलेल्या मोरीचे रुंदीकरण करुन नव्याने बांधकाम होणे गरजेचे आहे. येथील मोरी अरुंद असल्याने तसेच पुणे, मुंबई, नाशिक अन्य ठिकाणाहून येणार्या पर्यटकांना येथील रस्त्याचा अंदाज नसल्याने परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते. याठिकाणी यापूर्वीही अनेक वेळा अपघात झाले आहेत. आज या मोरीचे संरक्षक कठडे पाईप तुटून पडले असून, अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने लक्ष पुरवून या मोरीचे रुंदीकरण व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून जोर धरीत आहे.