। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
जून महिन्याची 13 तारीख उजाडली तरी देखील पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पनवेल तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासनाकडून सात गाववाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र हे पाणी देखील अपुरे पडत असल्याचे बोलले जात आहे.
उन्हाच्या झळा तीव्र जाणवू लागल्या आहेत. त्यातच पाण्याचे प्रक्षोभ निर्माण झाले असून नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. जलजीवन मिशन योजना देखील पनवेलमध्ये सपशेल अपयशी झाल्याने पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. मोजक्याच ठिकाणच्या जलजीवन मिशन योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आजदेखील नागरिकांना पिण्याची पाण्याची वानवा आहे. पनवेल पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीटंचाई आराखडा पाठवण्यात आला होता त्यानुसार सात गाववाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात माडभुवन, ताराटेप वाडी, शिवाजीनगर (कसळखंड) शिरढोणपाडा, बेलवाडी (नानोशी) कामठवाडी, गराडा यांचा समावेश आहे. या सात गाव वाड्यांमध्ये नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यातील काही ठिकाणी दररोज टँकरने पाणीपुरवठा होतो तर काही ठिकाणी एक दिवसाआड किंवा आठवड्यातून काही दिवस पाणीपुरवठा होतो. तालुक्यातील काही सोसायटीमध्ये देखील पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. बोअरवेलला पाणी येत नसल्याने अन्य ठिकाणाहून विकतचे टँकरचे पाणी घ्यावे लागत आहे.
पनवेल तालुक्यातील लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत पाण्याचे स्रोत कमी आहेत. तालुक्यात धरण असून देखील धरणाचे पाणी आजूबाजूच्या ग्रामस्थांना प्यायला मिळत नाही. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर मात्र पनवेल तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार आहे, त्याचा परिणाम सर्वत्र होणार आहे.







