चौलमळ्यात हजारो लीटर पाण्याची नासाडी
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्यावर चौलमळा येथे शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी एमएसआयडीसीकडून रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबीने पाण्याची पाइपलाइन फोडल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून, आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे.
चौलमळा येथील कृष्णादेवी मंदिराजवळ रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याचे खोदकाम सुरू असताना ही पाइपलाइन फुटली. पाइपलाइन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून गेले. एकीकडे नागरिकांना पाण्याचे नियोजन करून वापर करावा लागत असताना दुसरीकडे निष्काळजीपणामुळे पाण्याची अशी नासाडी होत असल्याने संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे. विकासकामे करताना संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनची काळजी घेणे आवश्यक असते. मात्र, खोदकामादरम्यान पाइपलाइन फुटल्याने कामाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने पाइपलाइनची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना, अशा प्रकारे पाणी वाया जाणे ही गंभीर बाब आहे. दोन तासापासून पाणी बंद करण्याचे शर्तीचे प्रयन्त सुरु असून, अद्याप यश आलेले नाही. आता संबंधित यंत्रणा या प्रकाराची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्य लाईन फुटली असून, तातडीची उपाययोजना म्हणून उमटे धरणावरून लाईन बंद करण्यास सांगितलं आहे.
निहाल चवरकर, उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग






