पालीच्या बल्लाळनगरीत भक्तीचा महासागर

पायी दिंड्यांनी पाली नगरी झाली भक्तिमय

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (दि. 29) भाविकांचा अक्षरशः महासागर लोटला.

रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध भागांतून 15 हजारांहून अधिक भाविकांनी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण बल्लाळनगरी दुमदुमून गेली होती. अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेशभक्तांनी उपवास, पूजा आणि दर्शनासाठी मोठ्या संख्येने पाली गाठली. रायगड जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या पायी दिंड्यांमुळे पालीचे वातावरण भक्तीमय झाले होते. लहान मुले, महिला, तरुण तसेच आबालवृद्ध मोठ्या उत्साहाने दिंड्यांमध्ये सहभागी झाले होते. भाविकांसोबत पर्यटकांचीही मोठी गर्दी झाली होती.

व्यवसायाला मिळाली चालना
अंगारकी चतुर्थीला मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने पालीतील स्थानिक व्यवसायांनाही चांगली चालना मिळाली. हॉटेल, लॉजिंग-बोर्डिंग, पेढे, पापड, लोणचे, मिरगुंड तसेच विविध प्रकारच्या वस्तूंच्या दुकानांमध्ये दिवसभर गर्दी होती. मंदिर परिसरातील दुकाने आणि हॉटेल्स भाविकांनी गजबजून गेली होती. भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे स्थानिक बाजारपेठेत चांगली आर्थिक उलाढाल झाली.
वाहतूक कोंडीने प्रशासनाची कसोटी
भाविकांची मोठी गर्दी असल्याने अनेकजण खासगी वाहने, लक्झरी बस आणि इतर वाहनांनी पालीत दाखल झाले. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही काळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची काळजी घेण्यात आली.
Exit mobile version