पायी दिंड्यांनी बल्लाळनगरीं झाली भक्तीमय
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील प्रख्यात धार्मिकस्थळ असलेल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत अंगारकी संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (दि. 5) भाविकांनी गर्दी केली होती. श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच लांब रांगा लागल्या होत्या. अंगारकी चतुर्थीनिमित्त रायगडसह राज्य व देशभरात गणेश भक्तांकडून उपवास, पूजा आणि मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. विशेषतः महाराष्ट्रात भाविक पहाटेपासूनच रांगा लावत असून, मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा व्यवस्था आणि विशेष सोयी प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
पालीत अंदाजे 25 हजारहून अधिक भाविक दाखल झाले होते. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या अनेक भागातून पायी दिंडी आल्या होत्या. उन्हाळी सुट्ट्यामुळे भाविक, पर्यटक गणेशभक्त बल्लाळ नगरीत उत्स्फुर्त व भक्तीभावाने दाखल झाले होते. यावेळी आलेल्या दिंडीतील भक्तीमय वातावरणात लहान मुले, आबाल वृद्ध, महिला, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. बल्लाळेश्वराला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते. तसेच मंदिरा बाहेर रांगोळी देखील काढण्यात आली होती. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून व भारतातून भाविक दाखल झाले होते. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल झाली असून, येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत. पाली नगरी भाविकांनी फुलून निघाली होती. सर्वत्र गणरायाचा जयघोष कानी पडत होता.
भाविकांमुळे येथील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग बोर्डिंग वाले, पापड, लोणचे मिरगुंड विक्रेते, पेढेवाले, छोटे मोठे दुकानदार व इतर व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. विविध वस्तूंनी भरलेली दुकाने व गर्दीमुळे मंदिर परिसर गजबजलेला दिसत होता. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. अनेक भाविक स्वतःची वाहने घेऊन आले होते. तर काही लक्झरी किंवा खासगी बसेसने आले. यामुळे पालीतील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. या भाविकांनी दुकानातून चांगली खरेदी केली. त्यामुळे धंदा चांगला झाला आहे. असे मनोहर मोरे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर यांनी सांगितले.
भाविकांच्या येणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन योग्य व्यवस्थापन व नियोजन करण्यात आले होते. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक तैनात आहेत. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त आधुनिक भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे.
जितेंद्र गद्रे, अध्यक्ष,
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली







