डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार
| कर्जत | प्रतिनिधी |
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला चाळीस लाख रुपये किमतीची आरोग्य उपकरणे देण्यात आली. विशेष म्हणजे ज्या उपकरणांची उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यकता आहे, तीच उपकरणे उपलब्ध करून देण्यात आल्याने गरीब व गरजू रुग्णांची आरोग्य सेवा अधिक चांगली होऊ शकते.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य उपकरणे वाटप सोहळ्याचे आयोजन रॉयल गार्डन सभागृहात करण्यात आले होते. समारंभाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनाने यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय म्हस्कर, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड उपस्थित होते. श्री सदस्य भगवान भोसले आणि श्रीधर बुंधाटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
विकास चित्ते यांनी प्रस्ताविकात, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सदस्य बैठकीच्या माध्यमातून ज्ञान दानाचे व व्यसनमुक्ती करण्याचे कार्य सुरु केले. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या कार्याचा जगभर प्रसार केला. तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना करुन अनेक समजपयोगी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. स्वच्छता अभियान, महाआरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व संगोपन, निर्माल्यापासून खत निर्मिती, जनसामान्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय उपकारणांचे वाटप आदी उपक्रम जगभरात राबविले आणि अजूनही राबवित आहेत, असे स्पष्ट केले.
याप्रसंगी कर्जत उपजिल्हा रुग्णालयासाठी आणलेली चाळीस लाख रुपये किंमतीची आरोग्य उपकरणे मान्यवरांच्या हस्ते डॉ. विजय म्हस्कर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी डॉ. म्हस्कर यांनी, ‘आज देण्यात आलेली आरोग्य उपकारणांची देणगी अमूल्य आहे. नुकतीच डायलीसिसच्या उपकरणांचे लोकार्पण झाले आहे. त्यासाठी सहा महिने पुरतील इतकी औषधे प्रतिष्ठानच्या वतीने आज देणगी स्वरूपात मिळाली. त्यामुळे सर्वसामान्यांना उपचार करणे अधिक सुलभ होईल. आपल्या रुग्णालयात टुडी इको तपासणीची कमतरता आहे. ती एका महिनाभरात उपलब्ध होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे’, असे सांगितले. राहुल गायकवाड यांनी ‘आमचे कुटुंब प्रतिष्ठानशी जोडलेले आहे. त्यांच्या कार्याची महती आम्हाला माहित आहे’, असे स्पष्ट केले.
उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी, ‘मी अनेक वर्षांपासून डॉ. धर्माधिकारी यांचे कार्य जवळून बघत आलो आहे. त्यांचे नियोजन व नेटवर्क आम्हा शासकीय यंत्रणेला मागे टाकेल असे आहे. श्री सदस्य कोणत्याही प्रलोभनाने काम करीत नाहीत, तर अगदी जीवाचे रान करून कोणतीही अपेक्षा न करता सातत्याने काम करीत असतात. ते स्वच्छता अभियान राबवतात. म्हणून सर्व श्री सदस्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी कोणत्याही कामासाठी हाक मारावी. आम्ही सदैव त्यांना सहकार्य करू’, असा शब्द दिला. अनिल सोनाने यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. स्वाती गुरव यांनी पसायदान सादर करून समारंभाचा समरोप केला.







