गुंतवणूकदार पीडितांचा आक्रोश

इतर घोटाळेही उघडकीस

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यात नव्हे तर, राज्यात चिटफंड घोटाळा गाजत आहे. या चिटफंड घोटाळ्याचा प्रश्‍न अधिवेशनात गाजला होता. त्यानंतर रविवारी खोपटे येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला रोष व्यक्त केला आहे. परंतु, आजपर्यंत गुंतवणूक करणार्‍यांची रक्कम मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे या आक्रोश मोर्चाने गुटवणूकदारांची रक्कम मिळण्याची शक्यता दिसत नसल्याचे गुटवणूकदारच सांगतात. आमची मेहनतीची रक्कम तरी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे गुंतवणूकदार सांगतात. यानंतर उरणमधील इतर चिटफंड आता उघड होऊ लागले आहेत.

उरण परिसरात चिटफंड योजनेत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी उरण, पनवेल, नवी मुंबई व इतर ठिकाणच्या हजारो भोळ्याभाबड्या लोकांनी पिरकोन गावातील सतीश गावंड तसेच कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील यांच्याकडे एजंटच्या मदतीने पैसे गुंतवले आहेत. काही दिवस पैसे मिळू लागल्याने गुटवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. मात्र, कोट्यवधी रुपयांचा आकडा होताच गुटवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाली असल्याचे उघड झाले. सध्या हे प्रकरण पोलिसांकडे आहे. पण, गुंतवणूकदारांना अजूनही दिलासा मिळाला नसल्याने नागरिक हैराण आहेत.

नुकताच विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नुकताच हा विषय गाजला होता. चिटफंडविरोधात खोपटे येथे गुटवणूकदारांच्या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हतबल झालेल्या गुटवणूकदारांनी आपले पैसे मिळतील या आशेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून फसवणूक करणार्‍यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यापूर्वी उरणमध्ये अशा प्रकारचे छोटे-मोठे घोटाळे झाले आहेत. त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांचे पैसे परत मिळाले. तर इतरांचे बुडीत खात्यात गेले आहेत.

उरणमध्ये सतीश गावंड व सुप्रिया पाटील यांचे चिटफंड घोटाळे उघड होऊनही गुंतवणूकदार इतर ठिकाणी हव्यासापोटी गुंतवणूक करून फसत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यामध्ये नुकताच 52 व 30 लाखांचा घोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे अशा आमिषाला बळी न पडता आपला मेहनतीचा पैसा गुंतवू नका, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

Exit mobile version