| नवी दिल्ली | वृत्तसंस्था|
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताला घरच्या मैदानावर पराभूत करणं कोणत्याही संघासाठी सोपं राहिलेलं नाही. गेल्या दशकापासून, भारतामध्ये पाहुण्या संघांसाठी द्विपक्षीय मालिका जिंकणे म्हणजे विश्वचषक जिंकल्यासारखे आहे. यादरम्यान भारतीय संघाला काही वेळा पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी गेल्या चार वर्षांत टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. पण घरच्या मैदानावर न हरण्याची ही मालिका खंडित झाली.
ऑस्ट्रेलियाने चेपॉकमध्ये भारतीय संघाचा 21 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली. गेल्या चार वर्षांत मायदेशात भारताला मालिकेत हरवणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला. हा पराभव अशावेळी झाला आहे, जेव्हा भारतात 6 महिन्यांनंतर एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय चाहत्यांना हा पराभव पचवणं सोपं नाही, खासकरून आपल्या संघाने घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकावा, अशी चाहत्यांची अपेक्षा असताना हा पराभव भारतीय चाहत्यांसह संघासाठी त्रासदायक आहे. ही मालिका भारताने गमावल्यावर बरेच भारताचे मायनस पॉईंट समोर आले आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात काही उणिवा आहेत. यासोबतच या मालिकेतील पराभवामागे मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा हेही प्रमुख कारण मानलं जात आहे.
ज्येष्ठांचा खराब फॉर्म
एक काळ असा होता की, भारतीय आघाडीच्या फलंदाजांपैकी कोणीतरी एकतरी चांगली खेळी करतच होता. शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यापैकी एक फलंदाज मोठी खेळी खेळायचा. ही गोष्ट टीम इंडियातून यंदा गायब होती. रोहित फॉर्ममध्ये नाही आणि कोहलीही पूर्वीप्रमाणे खेळू शकला नाही. शिखर धवन संघाबाहेर आहे आणि त्याच्या जागी शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असला तरी या मालिकेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला.
जबाबदारी घेणारं कोणी नाही
सध्या भारतीय वनडे संघात मधल्या फळीत एकही फलंदाज नाही ज्यावर विश्वास ठेवता येईल. केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांनी अनेकदा मॅच-विनिंग इनिंग्स खेळल्या पण ते विश्वसनीय फलंदाजांच्या श्रेणीबाहेर आहेत. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा हे अष्टपैलू आहेत, त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी भार आहे, पण इथे सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल सारख्या फलंदाजांकडून कठीण परिस्थितीत समंजस खेळी खेळण्याची अपेक्षा आहे, पण या दोघांनीही संघाला निराश केलं.
वेगवान गोलंदाजीत अधिक धार हवी
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे जागतिक दर्जाचे गोलंदाज असले तरी, हे दोन्ही गोलंदाज या मालिकेत फारशी रंगत पसरवू शकले नाहीत. विशेषत: जेव्हा विरोधी फलंदाज वेगवान फलंदाजी करण्यास सुरुवात करतो, तेव्हा हे गोलंदाज आक्रमक वृत्ती स्वीकारण्याऐवजी दबावाखाली दिसतात. इथे टीम इंडियाला बुमराहसारख्या गोलंदाजाची उणीव भासत आहे.