सत्यशोधकी भाई प्रा.एन.डी.पाटील

महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्य, यामध्ये शेती, संशोधन, पडीक जमिनींचा विकास, जुन्या रूढी, परंपरा यांची चिकित्सा, अंधश्रद्धा निर्मूलन, उपेक्षितांचे शिक्षण, अशा विधायक कार्यांचा वारसा छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भाई एस.एम.जोशी यांच्यानंतर समर्थपणे पुढे कोण चालविणार असा प्रश्‍न बहुजन समाजातील असंख्य लोकांना पडत असावा. पण त्याच वेळी 15 जुलै 1929 रोजी नियतीने सांगली जिल्ह्यातील (द.सातारा) ढवळी या गावी ज्ञानदेव व कृष्णाबाई या दाम्पत्याच्या पोटी महात्मा फुलेंच्या परंपरेतील स्वयंप्रकाशित तारा म्हणजेच नारायण पाटील यांचा जन्म झाला.

ज्या गावात उच्चवर्णीय कुटुंबातील पोरं दहावी उत्तीर्ण होऊ शकत नाही. अशा भागात पांडुरंग धोंडू परिट गुरुजी, खैरमोडे गुरुजी, अब्दुल गनी अत्तार सर यांच्यासारख्या विज्ञाननिष्ठ, विवेकी शिक्षकांमुळे नारायण यांच्या व्यक्तिमत्वास आकार येत गेला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, लहानपणी अकाली वडिलांचे निधन, यामुळे जबाबदारीचे भान त्यांना शेवटपर्यंत राहिले. थोडे दिवस तरी मद्य वर्ज्य करा, तोची पैसा ग्रंथासाठी हे महात्मा फुले यांचे विचार त्यांनी आजीवन जपले. लहानपणापासून दारूमुळे होणारी स्री वर्गाची परवड, आर्थिक विवंचना, कुटुंबाचे हाल एन.डी.पाटील यांनी जवळून पाहिले. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी समाजाच्या, सामान्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले व वडगाव येथील दारूचे दुकान बंद पाडण्यात यश मिळविले. त्यासाठी त्यांना 1 महिना तुरुंगवास झाला; पण लोकशाही पद्धतीने, अहिंसात्मक आंदोलन तोही सामूहिक शक्ती एकटवून, हा लढा, उठाव, यामुळे त्यांना मोठे बळ मिळाले.

एन.डी.पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, आष्टा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज, कोल्हापूर तसेच एल.एल.बी. पुणे ( सावित्रीबाई फुले ) विद्यापीठात पूर्ण केले. रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे अर्थशास्र विषयाचे प्राध्यापक, कमवा आणि शिका या कर्मवीरांच्या अभिनव योजनेचे प्रमुख तसेच रेक्टरचे पद निष्ठेने पार पडले. 6 वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर गिरणी कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या जबाबदारीमुळे त्यांना मुंबईत गिरणी कामगार व मजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्मवीरांना न सांगताच मुंबईला जावे लागले. व्यक्तिगत हितापेक्षा समाजहितास सर्वोच्च प्राधान्य, सुखासीन आयुष्याचा त्याग, दारिद्र्य आणि शोषण संपुष्टात आणून राजकीय, आर्थिक, सामाजिक पातळीवर समाजाची पुनर्रचना करण्यास प्राधान्य, स्वातंत्र, समता, बंधुता या संविधानाच्या मूलभूत तत्वांवर आधारित लोकशाही क्रांतीच्या चळवळीत निष्ठेने काम, मूठभर भांडवलदारांकडून मजूर व कामगार यांची पिळवणूक रोखण्यासाठी सर्वोतोपरी कृतीशील, विकेंद्रीत अर्थव्यवस्था, मूलभूत हक्कांची जपवणूक, खासगी संपत्तीवर नियंत्रण, उद्योगधंद्याचे राष्ट्रीयीकरण, अर्थव्यवस्थेवर सामाजिक नियंत्रण, नवीन समाजरचना करण्यासाठी लोकांची विवेकबुद्धी जागृत करण्याचा ध्यास त्यांनी कायमच जपला.

लोकांनी शिक्षण, विवेक यांचा अवलंब करावा याकरिता भाई एन.डी.पाटील यांनी आजीवन अत्यंत निष्ठेने कार्य केले. धनदांडग्या घटकांच्या हातात आर्थिक विकासाच्या फायद्याचे केंद्रीकरण व पारतंत्र्यात जेवढ्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत तेवढ्या आत्महत्या स्वातंत्रोत्तर कालखंडात झाल्या याचे दुख: शेवटपर्यंत त्यांना सलत राहिले. भारतातील सर्व समस्यांवर एकच पर्याय म्हणजे शिक्षण. समाजातील दुःखाचं, अज्ञान, अंधकार याचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे, हे कर्मवीरांनी जाणले होते. यासाठीच थोर समाजसुधारक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. समाजातील वंचित, उपेक्षित घटकाच्या दारात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम रयत शिक्षण संस्था करीत आहे.

या संस्थेत 1959 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एन.डी.यांना संस्थेत सभासद करण्याची विनंती केली. तेव्हापासून 2022 पर्यंत एन.डी. सर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी निष्ठेने व समर्पण वृत्तीने स्वतःला झोकून दिले. समाजातील अज्ञान, अंधकार नाहीसा करून समतेच्या बीजाची पेरणी केली. सामान्य, उपेक्षितांना शिक्षण देण्याचे विधायक काम एन.डी. यांनी अत्यंत निष्ठेने व अंतिम श्‍वासापर्यंत पार पाडले. भारतीय राज्यघटनेतील भाग 3 मध्ये कलम 21 नुसार प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. म्हणूनच रयत शिक्षण संस्थेत एन.डी.सर यांनी समाजातील उपेक्षित घटकांचे शैक्षणिक उत्थान हाच उदात्त हेतू समोर ठेवून आदिवासी भागात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवून कर्मवीरांच्या कार्यास बळ दिले.

1992- महात्मा जोतीराव फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, आसे ता. मोखाडा, जि. ठाणे
1992- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, चांभारशेत ता. जव्हार. जि. ठाणे
1992- राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, आडोशी, ता. मोखाडा, जि. ठाणे
1992- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ता.मोखाडा, जि. ठाणे
1992- प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, वावर ता.जव्हार. जि. ठाणे
1992- प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, नर्मदानगर ता.तळोदा जि. नंदुरबार
1994- डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, खरशेत, ता. त्रिंबकेश्‍वर, जि. नाशिक
1994- कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळदरी ता. अकोले जि. अहमदनगर

वरील ज्ञानाची पवित्र मंदिरे उपेक्षितांच्या दारी उभी करून एन.डी.सर यांनी फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीरांच्या विचारांचे बीज पेरून ठेवले. वंचितांच्या उत्थानासाठी 8 आश्रमशाळा सुरु केल्या. या भागात अशा आश्रमशाळा सुरु करण्याचे धाडस हे फक्त रयत शिक्षण संस्था करू शकते याची जाणीव या निमित्ताने झाल्याशिवाय राहत नाही. गाव तिथे ज्ञानमंदिर हा कर्मवीरांचा आग्रह आजीवन जपला.
शाळा रयत शिक्षण संस्थेचे माजी कार्याध्यक्ष व जेष्ठ विचारवंत आदरणीय प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. रयत शिक्षण संस्थेत 78 वर्षे योगदान देणारे रयत शिक्षण संस्थेचे ते भीष्माचार्य होते. संस्था कशी असावी, कशी चालवावी याचा वस्तुपाठ आदरणीय एन.डी.सरांनी घालून दिला. धनवान घरातील मुलगा फारसा कष्टाळू नसताना, पाहिजे तिथे शिक्षण घेऊ शकतो. पण दुर्गम, वंचित घटकातील विद्यार्थी कितीही ज्ञानपिपासू असला तरी उच्च व व्यवसायिक शिक्षणाचा खर्च तो पेलू शकत नाही. याची सल सरांना आजीवन सलत राहिली.मुलांना रयत शिक्षण संस्थेत गुणवत्तापूर्ण व संगणकीय शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

रयतला पदव्या देणारा कारखाना कधीही होऊ दिले नाही. संस्थेत गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे, यासाठी एम.के.सी.एल. मार्फत परीक्षा घेऊन गुणवत्तेने शिक्षक नेमण्यास आदरणीय एन.डी. सर, रावसाहेब शिंदेसाहेब, डॉ.अनिल पाटीलसाहेब यांनी जाणीवपूर्वक आग्रह केला. त्यामुळे सामान्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास संधी मिळाली. त्याचबरोबर नापासांची शाळा सुरु करून महाराष्ट्रात एक अभिनव उपक्रम सुरु केला.संस्थेत अनेक शाखांमध्ये पाण्यासाठी बोअर घेण्यापूर्वी शास्रयुक्त माहिती असेल अशाच तज्ज्ञ व्यक्तीमार्फत सल्ला घेऊन, सर्वेक्षण करून बोअर घेण्याचा नियम बनविला. माती परीक्षण व पाणी परीक्षण, टिश्यू कल्चर, कृषी केंद्रे, शेती विकास प्रकल्प, जैन इरिगेशन कंपनीसोबत करार यासारख्या अनोख्या तंत्राचा वापर संस्थेच्या शेतीसाठी होऊ लागला.

सर व्याख्यानात सासू-सून-मंदिर याची छानशी गोष्ट ते नेहमी सांगत ती गोष्ट अशी. एकदा नवीन लग्न झालेल्या सुनेला घेऊन सासू गावातील मंदिरात घेऊन जाते. मंदिरात जाताना कमानीपाशी सुनेला मोठा सिंह दिसतो. सून सासूला म्हणते, आत्याबाई मला भीती वाटते. सासू म्हणते, भिऊ नकोस तो दगडाचा आहे. तो काय करेल. पुढे गेल्यावर फणा काढून उभा नाग दिसतो. सून पुन्हा म्हणते आत्या, मला भीती वाटते. अगं ! नको भिऊ ते पण दगडाचं आहे. ते काय करतयं? चल तू पुढे. गाभार्‍यात मूर्ती दिसते. सासू म्हणते माग तुला काय पाहिजे ते! सून म्हणते, अहो ते पण दगडाचंच की ते काय देणार मला? अशा प्रकारची मर्मभेदक उदाहरण देऊन सर सत्यशोधक विचार जपण्यास इतरांना उद्युक्त करीत. प्रत्येकाने विवेकवादी व विज्ञानवादी व्हावे, शिक्षण, सतत अभ्यास व निष्ठेने काम केल्यास आपल्याला मंदिरात जाण्याची गरज नाही हा विचार त्यामध्ये असायचा.

जुन्या रूढी व परंपरा याची चिकित्सा करावी तसेच इतरांचे आयुष्य सुंदर व अवघ्यांचे आंगण ज्ञानरूपी प्रकाश किरणांनी दिपून टाकणे हाच उद्देश्य या उदाहरणामागे असायचा.रयतच्या अनेक शाखा आर्थिक दुर्बल शाखा आहेत. त्यासाठी रयत सेवकांना महिन्याला आपल्या एकूण पगाराच्या 1% कृतज्ञता निधी व 22 सप्टेंबर कर्मवीर जयंतीनिमित्त 1 दिवसाचा पगार देण्याचे आवाहन केले. याचे आप्पासाहेब पाटील यांनीही समर्थन केले व त्यास पाठींबा दिला. आजअखेर वर्षाला कोट्यावधी रुपये निधी जमा होतो. या निधीतून दुर्गम व ग्रामीण भागात स्वच्छतागृह, इमारत दुरुस्ती, संगणक व एल.सी.डी. खरेदी करून शाखेला वितरीत केली जात आहे.

1992 मध्ये पाणलोट विकास, प्राथमिक शिक्षण, व स्री आरोग्य, भारत जन-ज्ञान विज्ञान कार्यक्रम, राष्ट्र पुनःनिर्मितीसाठी जनचळवळ कार्यक्रम यासारखे विधायक कार्यक्रम राबविले. 1993 मध्ये लातूर व किल्लारी भूकंप यासाठी 5 लाख रुपये निधी, जुलै 2005 मध्ये आलेल्या महापूरात बेघर झालेल्या गोर-गरीब बांधवाना 56 लाख रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ही अभिनव व विधायक संकल्पना एन.डी.सर यांच्याकडून आली. रयत शिक्षण संस्था ही एक लोकशक्ती आहे. ही कर्मवीरांची शिकवण व जाणीव सरांनी आजीवन जपली.

8 एप्रिल 1968 मध्ये वसंतराव नाईक सरकार काळात तत्कालिन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने शिक्षणविषयक श्‍वेतपत्रिका काढली. यामध्ये प्रगत एस.एस.सी. आणि सामान्य एस.एस.सी. अशा दोन प्रकारचे प्रवाह असलेले शिक्षण सुरु करण्याचा प्रयत्न होता. पण एन.डी.सर यांनी अशा पद्धतीने भेदाभेदाचे शिक्षण जर सुरु केले तर आर्थिक दुर्बल, उपेक्षित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मोठा अडथळा होईल. याविरोधात सरांनी महाराष्ट्रात 400 सभा घेतल्या. शैक्षणिक श्‍वेतपत्रिका ही पुरोगामी महाराष्ट्राला, उपेक्षित घटकाला कशी अन्यायकारक व विषमता निर्माण करणारी आहे. याविषयी मंत्रिमंडळाला सखोल व अभ्यासपूर्ण माहिती दिली. पुढे ही श्‍वेतपत्रिका शासनाला रद्द करावी लागली.शेतकर्‍यांच्या न्याय व हक्कासाठी स्वतःची बुद्धी, सामर्थ्याचा उपयोग अखेरपर्यंत केला.बाहेर दौर्‍यावर असताना बाथरूममध्ये पडून सरांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. शस्रक्रिया झाली तरीसुद्धा न थांबता सर आंदोलने, दौरे करत राहिले. व्याख्याने देत राहिले. सुरुवातीला स्टिक नंतर वाकर, व्हील चेअरचा वापर करीत अन्यायकारक धोरणाच्या विरोधात सर रस्त्यावर उतरले. पण समतेची ज्योत अखंड तेवत ठेवण्याची जिद्द मात्र त्यांनी कधीही सोडली नाही.

मला अनेक वेळा आदरणीय एन.डी.सर यांच्याबरोबर सहवास लाभला. त्यांची काम करण्याची पद्धत, प्रचंड वाचन, सखोल चिंतन, तत्वाशी बांधील, विविध प्रश्‍नांबाबत सखोल माहिती, पूर्ण समर्पण, आयुष्यभर सत्याची बाजू, इतरांचे आयुष्य सुंदर करण्याचा ध्यास, प्रश्‍नांची उकल व त्यावरील उपाययोजना सांगण्याचे विलक्षण कसब, असा जगावेगळा देवमाणूस मी जवळून अनुभवला. हे मी माझे भाग्य समजतो. मला कर्मवीर, साने गुरुजी पाहता आले नाही, अनुभवता आले नाही पण प्रा.ग.प्र.प्रधान, क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकवडी, भाई एन.डी.पाटील यांच्या रूपाने मी कर्मवीर व साने गुरुजी अनुभविले याचा मला अभिमान वाटतो. सर सामान्य माणसाची रस्त्यावरची लढाई अखेरपर्यंत लढत राहिले. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी तसेच समाजाच्या संसारात रममाण होणारे सत्यशोधक भाई एन.डी.पाटील हे खर्‍या अर्थाने गुणवत्तापूर्ण व रुबाबदार आयुष्य जगले. सर उगवत्या पिढीला दिशा देणारा चैतन्यदाई ठेवाच आहे. सत्यशोधक विचार भारत देशाच्या, महाराष्ट्राच्या मातीत व रक्तात उतरविणे म्हणजे भाई एन.डी.पाटील यांना खरी आदरांजली ठरेल.

Exit mobile version