| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेटपटू करुण नायरला भलेही आयपीएलमध्ये संधी मिळाली नसेल, मात्र तो इंग्लडच्या कौंटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडत आहे. काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना नायरनं नाबाद 202 धावा केल्या. केरळच्या करुण नायरने 253 चेंडूत 21 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 202 धावा करत ग्लॅमॉर्गनच्या गोलंदाजांची तारांबळ उडवून दिली. नॉर्थम्प्टनशायरकडून रिकार्डो वास्कोसेलास (182) आणि सैफ जायब (100) यांनीही शतकी खेळी खेळल्या.
व्हिटॅलिटी काउंटी चॅम्पियनशिपनं करुण नायरच्या द्विशतकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. दोन मिनिटं आणि एक सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये करुण नायर अनेक आकर्षक फटके खेळताना आणि आपले पहिले द्विशतक पूर्ण करताना दिसत आहे.
कौंटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा करुण नायर हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. याआधी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी हा पराक्रम केला होता. अझहरनं काउंटी क्रिकेटमध्ये दोनदा द्विशतक झळकावले आहे. डर्बीशायरकडून खेळताना त्यानं लीसेस्टरशायरविरुद्ध आणि नंतर डरहमविरुद्ध 1994 मध्ये द्विशतक झळकावले होते. त्याच वेळी, चेतेश्वर पुजारा हा काउंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक झळकावणारा भारतीय फलंदाज आहे. पुजारानं काउंटी क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावली आहेत.







