। पुणे । प्रतिनिधी ।
पिंपरी चिंचवड येथील काटेपुरम चौक येथे भरदिवसा एकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. ही घटना साडेदहाच्या सुमारास घडली असून यात योगेश जगताप यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास योगेश जगताप हे काटेपुरम चौकात असताना अचानक त्यांच्यावर एकाने गोळ्या झाडल्या. ते पाहून जगताप पळत सुटले. त्यांच्यात झटापट झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आरोपीने जगताप यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या असून त्यापैकी दोन त्यांना लागल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जगताप यांचा मृत्यू झाला आहे.
हा चौक नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली आहे. ही माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अद्याप गोळीबाराचे कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.