| पनवेल | वार्ताहर |
सोन्यासारख्या पिवळ्या धातूच्या माळेची लगड देऊन दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर वरंडे हे मालेवाडी, सुकापुर येथे राहत असून, त्यांचा आकुर्ली येथे कटलरीचा शॉप आहे. त्यांच्या शॉपमध्ये राजू नावाचा इसम आला आणि काही वस्तू घेऊन गेला. त्यानंतर तो गवंडी काम करत असून, त्याला एक वस्तू भेटली आहे आणि ती गरम पाण्यात साफ केली असता सोन्याची आहे ती मला तपासून द्या असे त्यांनी सांगितले. यावेळी त्या सोन्याच्या मण्याची तपासणी केली असता 29 कॅरेट सोने असल्याचे सोनाराने पावती दिली. त्यानंतर त्याने वारंवार फोन करून दहा लाखांची गरज असल्याचे सांगितले. ते दोघे कल्याण रेल्वे स्टेशन येथे भेटले. त्यावेळी त्याने सोन्यासारख्या दिसणार्या माळा दाखवल्या. त्यांचे वजन एक किलोच्या आसपास होते. यावेळी राजूने दिगंबर यांना दहा लाख रुपये द्या आणि सर्व दागिने तुम्हाला देतो असे सांगितले. त्यावेळी ते पैशांची जुळवाजुळव करतो असे सांगून घरी आले. त्यांनी दहा लाख रुपये जमा केले आणि 26 फेब्रुवारी रोजी दहा लाख रुपये कल्याण रेल्वे स्टेशन येथे जाऊन दुसर्या 35 वर्षीय इसमाकडे दिले व त्याच्याकडून सोन्याच्या माळांची लगड असलेली पिशवी घेतली. त्यांनी ती सोन्याच्या माळांची लगड चेक केली असता, त्या सोन्याच्या नसल्याचे त्यांना समजले. राजूला फोन केला असता त्याचा फोन बंद आला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिगंबर वरंडे यांनी तक्रार दाखल केली.