निखिल पवार यांची थक्क करणारी गाथा; कर्तृत्वातून घडवली वेगळी ओळख
| माणगाव | प्रतिनिधी |
आजच्या धावपळीच्या जगात स्वतःच्या यशासोबत समाज, इतिहास, संस्कृती आणि नातेसंबंध यांचेही जतन करणारी माणसे फारच दुर्मिळ झाली आहेत. अशाच दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव निखिल पवार यांचे घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या तरुणाने आपल्या जिद्द, परिश्रम, शिस्त आणि राष्ट्रभक्तीच्या बळावर एक प्रेरणादायी जीवनप्रवास घडवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारण्यासाठी ज्या गड-किल्ल्यांचा आधार घेतला, त्या इतिहासाच्या साक्षीदारांप्रती निखिल पवार यांना विलक्षण प्रेम आहे. हे प्रेम केवळ छायाचित्रांपुरते किंवा सोशल मीडियापुरते मर्यादित नसून, प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी ते सिद्ध केले आहे. गड-किल्ल्यांवरील स्वच्छता मोहिमा, दुर्गसंवर्धन, ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि जनजागृती यामध्ये ते सातत्याने योगदान देत आहेत. प्रत्येक शनिवार आणि रविवार निखील पवार त्यांच्यासाठी विश्रांतीचे दिवस नसतात, तर इतिहासाच्या सेवेसाठी समर्पित दिवस असतात. महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग मोहिमा राबवून ते युवकांना इतिहासाची ओळख करून देतात. राष्ट्रभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम ते निष्ठेने करत आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रातील 50 हून अधिक किल्ल्यांना भेट देऊन त्यांनी दुर्गसंवर्धनाच्या कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
त्यांचा इतिहासावरील प्रेमाबरोबरच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर विशेष भर आहे. जवळपास 40 हाफ मॅरेथॉन, सायकलिंग आणि विविध साहसी उपक्रमांमध्ये ते नियमित सहभाग घेतात. मुंबई, ठाणे, पुणे, गोवा आणि बंगळुरू येथे आयोजित 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये त्यांनी यशस्वी सहभाग नोंदवून आपल्या जिद्दीची वेगळी छाप उमटवली आहे. त्यांच्या मते, मजबूत शरीर आणि सशक्त मन हेच यशस्वी आयुष्याचे खरे आधारस्तंभ आहेत. देशभक्ती आणि समाजसेवेची भावना त्यांच्या रक्तातच भिनलेली आहे. राष्ट्रहित, सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांना त्यांनी आपल्या जीवनाचा पाया बनवले आहे. समाजातील प्रत्येक घटकाबद्दल आत्मीयता बाळगत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
दुर्गसंवर्धन, इतिहासप्रेम, फिटनेस, शेती, डिजिटल क्षेत्र, कुटुंबवत्सल स्वभाव आणि व्यावसायिक यश अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत निखिल पवार यांनी एक आदर्श जीवनप्रवास घडवला आहे. त्यांच्या कार्यातून आजच्या युवकांना जिद्द, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा मिळत आहे.







