आनंद शिधाचा पत्ताच नाही; गोडावूनमध्ये पोहचला पण दुकानात कधी पोहचणार?

कुठे तेल नाही, कुठे धान्य नाही
पिशवी नसल्याने वितरण कठीण; फक्त पनवेलमध्ये 352 पिशव्यांचे वितरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

इडी सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी जाहीर केलेल्या आनंद शिधेचा आनंद दिवाळी दोन दिवसांवर आली तरी रायगड जिल्ह्यातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचलाच नाही. त्यामुळे जनतेच्या मनात अजूनही नाराजीच आहे. चार लाख 48 हजार 075 पैकी आतापर्यंत फक्त पनवेलमध्ये 352 लाभार्थ्यांना शिधा मिळाला आहे. अनेक तालुक्यांमध्ये 30 ते 40 टक्केच शिधा पॅकेजेस पोहचले आहेत. तर काही ठिकाणी अर्धे अर्धे सामान पोहचले आहे. त्यामुळे तेल नाही तेथे धान्य तर धान्य तीथे तेल नाही असा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेमध्ये गोंधळ उडाला आहे.

राज्य सरकारने 100 रुपयात जनतेची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. ही योजना जाहीर होण्यापासून वादाच्या भोवर्यात अडकली आहे, ही शिधा जनतेपर्यंत पोहोचवणे शक्य नाही. केवळ 20 टक्के धान्य जिल्ह्याच्या गोदामात पोहोचले आहे. त्यातही एक चार पैकी एक धान्य पोहोचले नसल्याने चार धान्याचे किट पॅक करण्याचे काम थांबले आहे, तर या चारही वस्तू ज्या बॅगेत पॅक करायच्या आहेत. त्या बॅगदेखील पोहोचल्या नाहीत हे पाहता फक्त तीन वस्तूंचे पॅकिंग करायचे कसे ? असा प्रश्‍न गोडावून कीपर आणि वितरण कर्मचार्यांना पडला आहे.

राज्य सरकारला या दिवाळी भेटीत एक कोटी पासष्ट लाख लाभार्थ्यांना 100 रुपयात चणाडाळ, रवा, साखर आणि पामतेल अशा चार वस्तू प्रत्येकी एक किलो देण्याचं निर्णय झाला. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 4 लाख 48 हजार 075 एवेढ लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत अलिबाग, पनवेल, उरण या तालुक्यात चारही चिजवस्तू तर पेण, कर्जत, खालापूर, तळा, सुधागड, रोहा या तालुक्यात दोन तीन वस्तू पोहचल्या असून मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर, महाड, माणगाव या सहा तालुक्यात मात्र काहीच पोहचले नसून गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्व वस्तू पोहचणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी सांगितले.

प्रत्यक्षात सर्व वस्तूंचे पॅकेजेस काही तालुक्यांच्या फक्त गोडावून मध्ये आले आहेत. मात्र त्याचे वितरण अजूनही झालेले नाही. सदर वितरण होण्यासाठी किमान दोन ते तिन दिवसांचा अवधी लागेल. त्यामुळे प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहचण्यासाठी दिवाळीचा पहिला दिवस उजाडेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. अलिबागमध्ये प्रत्यक्षात माहिती घेतली असता 30 ते 40 टक्केच शिधा पोहचल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात आदिवासी बहुत व दुर्गभ भागात सर्वात आधी शिधा पोहचणे आवश्यक होते मात्र शहरी भागातच सर्वात आधि या शिधा पोहचविल्या जात आहेत.

अलिबाग तालुक्यात 40 हजार 622, पेण 41 हजार 352, मुरुड 17 हजार 175, पनवेल 72 हजार 016, उरण 26 हजार 577, कर्जत 42 हजार 182, खालापूर 37 हजार 230, माणगाव 36 हजार 984, तळा 10 हजार 519, रोहा हजार 115, महाड 29 हजार 378, श्रीवर्धन 7 हजार 149, म्हसळा 14 हजार 925 तर पोलादपूर 9 हजार 882 इतके लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांपर्यंत दोन दिवसात पोहचणे शक्य नाही. त्यामुळे आनंद शिधा या योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

दोन दिवसात वितरणाचा प्रयत्न
आम्ही रोज या पुरवठ्याचा आढावा घेत आहोत, आज राज्यातील केवळ 20 टक्के भागात जिल्हा गोडावूनला शिधा पोहोचली आहे, पण एक वस्तू कमी असल्याने किट पॅकिंग करणे थांबले, तर 20 टक्यांपैकी काही ठिकाणी शासन लोगो असलेल्या बॅग पोहोचल्याच नाही त्यामुळे वितरण थांबल आहे. येत्या दोन दिवसात जास्तीत जास्त ठिकाणी वितरण करण्याचा प्रयत्न असेल. 21 कोटींची बँक गॅरंटी तीन आठवड्यांनी जमा केली आहे, याबाबत आम्ही संबंधित फेडरेशनला विचारणा केली आहे, पण कुठलीही कारवाई केली नाही, असे प्रभारी वित्तीय सल्लागार मनोज कुमार शेट्ये म्हणाले.

निकृष्ट वस्तू पुरवठ्याची भीती
ही शिधा जनतेपर्यंत पोहोचवताना प्रत्येक किलो वस्तू शासनाच्या छपाई पॅकिंगमध्ये देणे बंधनकारक होते, म्हणजे पॅकिंग कोणी केलं? वजन किती? गुणवत्ता काय? पॅकींग दिनाक, न्युट्रीशन व्हॅल्यू या सर्व गोष्टींची छपाई होणे गरजेचे होते पण आता बिना छपाईच्या पॅकिंगमुळे गुणवत्ता कशी तपासणार? हा विषय ऐरणीवर आला, हे पाहता निकृष्ट वस्तूंचे वाटप तर होणार नाही ना? असा प्रश्‍न अनेकांनी उपस्थित केला.

जिल्ह्यातील सर्व पात्र शिधापत्रिका धारकांना आनंद शिधा वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्व तालुक्यात आनंद शिधा पोहचणार असून त्याचे तात्काळ वितरण सुरु करण्यात येणार आहे.

मधुकर बोडके
जिल्हा पुरवठा अधिकारी

शासनाच्या परिपत्रकानुसार पुरवठा विभागाकडे आनंद शिधासाठीचे पैसे भरणा करण्यात आले आहेत. पुरवठा विभागाकडून वितरण झाल्यानंतर त्याचे तात्काळ वितरण करण्यात येईल.

कौत्सुभ जोशी
शिधा पत्रिका दुकान चालक
Exit mobile version