अनंत गीतेंना बहूमतांनी निवडून द्या- आ. संजय पोतनीस

| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते सहा वेळा खासदार झाले. त्यात केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केले आहे. मात्र, त्यांनी कधीही पदाचा दुरुपयोग केला नाही. प्रामाणिक नेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. या निवडणूकीत त्यांना बहूमतांनी निवडून द्या, असे आवाहन आ. संजय पोतनीस यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शेतकरी भवन येथे इंडिया आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि.25) आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, प्रदिप नाईक, ॲड. गौतम पाटील, पिंट्या ठाकूर, कविता ठाकूर, समीर ठाकूर, कमलेश खरवले, संदीप पालकर, अजय झुंजारराव आदी इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपसोबत असताना शिवसेनाला नेहमी दुय्यम दर्जेची वागणूक देण्याचे काम भाजपने केले आहे. त्यांनी शिवसेनेला संपविण्याचा घाट घातला. शिवसेना फोडण्याचे काम केले. हुकुमशाही निर्माण करण्याची भाजपची भुमिका आहे. देशातील विरोधक संपवून एकहाती सत्ता निर्माण करून नागरिकांना गुलाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजप संविधान विरोधी भूमिकेतून काम करीत आहेत. आता देशातील लोकशाही वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान काढून त्याठिकाणी स्वतःच्या मर्जीने सत्ता निर्माण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून तुम्हा आम्हा सर्वांना समानतेचा मार्ग दिला. अन्यायाविरोधात लढण्याची व बोलण्याची ताकद दिली. ते संविधान वाचविण्यासाठी या निवडणूकीत अनंत गीते यांना बहूमतांनी निवडून द्या, असे आवाहन पोतनीस यांनी केले.

2009 ते 2019 ची निवडणूक आपण सर्वांनी पाहिली. पंरतु, 2019 ते 2024 या पाच वर्षांमध्ये कमालीचा बदल राज्यपातळीवर तसेच देशपातळीवर झाला आहे. 2024ची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे. जर आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ठामपणे मत दिले नाही तर कदाचित ही निवडणूक शेवटची निवडणूक ठरू शकेल. कदाचित 2029 पासून निवडणूका होणारही नाहीत, अशी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनंत गिते यांना निवडून आणण्यासाठी आपण धगधगती मशाल पेटवली आहे. तसेच, निश्कलंक व्यक्तीमत्व म्हणून अनंत गीते यांना निवडून द्यायचे आहे. शेकापक्ष तसेच महाविकास आघाडीतील सर्वपक्षीयांनी निर्धार केलेला आहे की, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते यांना बहुमताने विजयी करायचे आहे.

ॲड. मानसी म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष
Exit mobile version