शिंदे गटाचा उडवला धुव्वा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. उसने आव आणून निवडणुकीत उतरलेल्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह सर्व उमेदवारांचा धुव्वा उडवला. निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी शेतकरी भवन येथे एकच जल्लोष साजरा केला. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, माजी आ. पंडित पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

शुक्रवारी अलिबागमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 1493 पैकी 1321 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टक्केवारीनुसार 88 टक्के मतदान झाले. दरम्यान, महाविकास आघाडीने आपले बहुसंख्य उमेदवार बिनविरोध निवडून आणून यापूर्वीच वर्चस्व मिळवले आहे. मात्र, काही जागांवर शिंदे गट आणि भाजपने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने निवडणुकांचा सोपस्कार पार पाडत आहे.
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागापैकी 7 बिनविरोध तर 11 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदारसंघात 11 जागांसाठी 13, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 6, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 3 तर हमाल/मापारी मतदार संघात महाविकास आघाडीचा बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे. आज पार पडलेल्या मतमोजणीत ग्रामपंचायत मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवारा भास्कर भोपी यांना 538 तर भगत यांना 518 मते मिळाली. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी आणि शैलेश पाटील यांचा महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी दारुण पराभव करीत धुव्वा उडवला.
कृषी पतसंस्था व बहूउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे सलीम तांडेल, अनंत पाटील, संजय पाटील, स्वप्निल पाटील, यशवंत भगत, अशोक म्हात्रे, कमळाकर साखळे हे उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले. तर शिंदे गटाच्या नंदन पाटील आणि संदेश थळे यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. व्यापारी आणि अडत्यांचा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतिक पाटील तसेच सुभाष वागळे यांनी विजय मिळवत शिंदे गटाचे संजय भावे यांचे पारिपत्य केले.