अनंत गीते यांचा नांदगाव येथील कार्यकर्त्यांशी संवाद

| मुरूड-जंजिरा | वृत्तसंस्था |

देशभरातील जनतेत भाजप सरकारच्या विरोधात असंतोषाची मोठी लाट असल्याने इंडिया आघाडीचेच सरकार येणार असल्याचे प्रतिपादन 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.

काँग्रेसचे नेते तथा नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अस्लमभाई हलडे यांच्या निवासस्थानी जमलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना गीते यांनी यावेळी संबोधित करताना या निवडणुकीत महायुतीच्या मोठमोठ्या नेत्यांना मतदार पराभूत करणार आहेत. यावेळी आपण देखील दोन लाखांच्या फरकाने निवडून येणार असल्याचे सांगितले. कुणबी समाजाची मते तर मला मिळणार आहेतच शिवाय मुस्लिम मतदारांचाही मोठा पाठिंबा मिळणार आहे. भाजप उमेदवाराला तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. पेणच्या सभेचे वृत्त आपण पाहिलेच आहे. महाड, दापोली भागासह मुरुड मध्येही मलाच आघाडी मिळणार यात शंकाच नाही. यावेळी शेकापच्या नेत्यांसह त्यांचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत शेकापच्या कार्यकर्ता मेळाव्यातील आमदार रोहित. पवारांच्या अभ्यासू भाषणाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. येत्या 15 एप्रिल रोजी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी उबाठा जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपप्रमुख प्रशांत मिसाळ, अलिबाग विधानसभा प्रमुख प्रमोद भायदे, नरेश कुबल, सुदेश घुमकर, अस्लम हलडे आदींनी बूथ कमिट्या व अन्य रणनीती बाबत चर्चा केली.यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नौशाद शाबान यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, शेकाप आदी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version