अनंत गिते यांचा लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांचे अर्ज सोमवारी भरण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे हा अर्ज दुपारी दाखल करण्यात आला. यावेळी एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.


इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गिते उमेदवारी अर्ज भरणार असल्याने त्यांना पाठींबा देण्यासाठी शेतकरी भवन ते शिवसेना भवन परिसरात सोमवारी (दि.15) सकाळी नऊ वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. सकाळी अकरा वाजल्यापासून हा परिसर कार्यकर्त्यांनी बहरून गेला. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, उमेदवार अनंत गिते, माजी आ. पंडित पाटील, आ. भास्कर जाधव, ॲड. प्रवीण ठाकूर आदी इंडिया आघाडीच्या नेत्यांचे शेतकरी भवनजवळ आगमन होताच, गिते साहेबांचा विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. शेतकरी भवन येथून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली जोगळेकर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी नाका, मारुती नाका, कर्वे रोड ते जिल्हाधिकारी अशी काढण्यात आली.


यावेळी आ. भास्कर जाधव, माजी आ. पंडित पाटील, माजी आ. अनिल तटकरे, माजी आ. संजय कदम, काँग्रेसचे नेते ॲड. प्रवीण ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, अलिबाग नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा ॲड. श्रध्दा ठाकूर, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, युवा नेते सवाई पाटील, विष्णू पाटील, संदिप घरत, शिवसेना तालुका प्रमुख शंकर गुरव, संदीप पालकर, रवि ठाकूर, शिवसेनेचे पिंट्या ठाकूर, सुनील थळे यांच्यासह शेकाप व इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी अनंत गिते यांचे जल्लोषात स्वागत केले. अलिबागमधील मुस्लीम समाजाच्यावतीने अनंत गिते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर ही रॅली शिवसेना भवनजवळ थांबली. कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी गिते यांनी कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळली.


एक वेगळा उत्साह या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा दिसून आला. ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह, तरुण कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेऊन अनंत गिते यांच्या उमेदवारीबाबत आनंद व्यक्त केला. शेकाप नेते आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे अनंत गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Exit mobile version