| अलिबाग | वार्ताहर |
उरण तालुक्यातील अनेक कातकरी वाड्यावर उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जातीच्या दाखल्यांचे वाटप संपन्न झाले. जातीचे दाखले वाटप केल्यानंतर कातकरी बांधवांच्या चेहर्यावर अनमोल आनंद झळकत होता.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि त्यांच्या इतर अधिकारी-कर्मचार्यांच्या सहकार्याने अडुंबाची कातकरीवाडी जासई, कोल्हापूर कातकरीवाडी चानजे, लिंबाची कातकरीवाडी, डावूर नगर कातकरीवाडी उरण येथील कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
यावेळी संतोष घरत, दत्ता गोंधळी, नामदेव ठाकूर, आदिवासी प्रतिनिधी मनीष कातकरी हे उपस्थित होते. उरण सामाजिक संस्थेने आदिवासी कातकरी बांधवांसाठी मागील दोन वर्षात केलेले काम पाहून (दि.4) जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी उरण सामाजिक संस्था व असे काम करणार्या अन्य सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी वाडीवर जातीचे तसेच अन्य शासकीय दाखले वाटप शिबिरे घेण्याचे निर्देश सर्व उपविभागीय अधिकार्यांना दिले आहेत.
कातकरी बांधवांच्या चेहर्यावर हसू फुलविण्याच्या या प्रयत्नांबद्दल प्रा.राजेंद्र मढवी यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि सर्व मंडळ अधिकारी, आदिवासी विकास निरीक्षक, तलाठी, महसूल विभागातील इतर अधिकारी-कर्मचार्यांचे विशेष आभार मानले आहेत.