लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
। पालघर । प्रतिनिधी ।
जमिनीच्या प्रकरणात बाजूने निकाल देण्यासाठी 20 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी मांडवीचे वनक्षेत्रपाल संदीप चौरे यांच्यासह दोघांवर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचेच्या रकमेचा 10 लाखांचा पहिला हफ्ता घेण्यासाठी ते दोघे वसईत आले होते. मात्र, सापळ्याची कुणकूण लागताच ते पसार झाले. तक्रारदार यांच्या मालकीची 7 गुंठे जागा वसईतील सासूपाडा येथे आहे. 2007 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनविभागाने ही जागा ताब्यात घेऊन सील केली होती. हे प्रकरण मांडवी परिक्षेत्राकडे प्रलंबित होते. या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करून ती परत मिळवून देण्याचे आश्वासन मांडवी परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल एस.टी.चौरे यांनी दिले होते.