संजय राऊत यांचा हल्लाबोल
। मुंबई । प्रतिनिधी ।
बीडमधील चित्र अत्यंत गंभीर असून हा प्रकार बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वी चालत असलेल्या दहशतवादासारखा आहे. अपहरण, खंडण्या, राजकीय हत्या आणि त्यांना संरक्षण हे एकेकाळी बिहारचे चित्र होते. तेच आज बीड, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, ठाण्यात दिसत आहे. कल्याणमध्ये घडलेली घटनाही हृदयद्रावक असून निवडणुकीपूर्वी राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करण्यात आले होते. आता जो नराधम पकडला आहे त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे खासदार चिरंजीव गप्प का? असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी गुरुवारी (दि.26) सकाळी माध्यमांशी बोलताना केला आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, बीडमध्ये गेल्या काही वर्षात कशाप्रकारे हत्या झाल्या, त्यामागे कोण आहे, कुणा-कुणाच्या हत्या झाल्या आणि त्या कशा दाबल्या गेल्या याचा एका व्यक्तीने व्हिडीओ केला असून तो व्हिडीओ मी सोशल मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. सच्चे गृहमंत्री असाल तर या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे. ते पुढे म्हणाले की, फडणवीस यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे. मग बीडमध्ये अभय दिली जाणारी तुमची पोरं की जावई आहेत? बीडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये 38 राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आल्याचे राऊत म्हणाले.
तसेच, बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजप, आरएसएस, देवेंद्र फडणवीस यांचे संरक्षण आहे का? बीडमधील हत्याकांडाचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे. त्या भागातले एक नाही तर दोन मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या जनतेचे, माय भगिनींचे रक्षण करण्यासाठी गृहमंत्रीपद मिळालेले आहे. परळी आणि आसपासच्या परिसरात अनेक लाडक्या बहिणींचे कुंकू पुसले गेले आहे. ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. लाडक्या देवाभाऊंनी भावाचे कर्तव्य म्हणून कायद्याने याचा बदला घ्यावा. परंतु, फडणवीस, अजित पवार हेच सगळे लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणार्या अर्बन नक्षलवाद्यांना संरक्षण देत आहेत. असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंना राजकीय आशीर्वाद
धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा राजकीय आशीर्वाद आहे. लोकभावना इतकी तीव्र आहे की फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचा राजीनामा घेतला पाहिजे. कितीही मोठा गुन्हेगार असू द्या, खपवून घेणार नाही असे फडणवीस म्हणतात. मग हे कोण आहेत? परळीमध्ये 118 बुथवर दहशत आणि बंदुकीच्या जोरावर मतदान होऊ दिले नाही. फडणवीस, निवडणूक आयोगाला हे दिसत नाही का? खरे तर यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात, असा टोलाही राऊत यांनी लगावला.