। पॅरीस । वृत्तसंस्था ।
ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरे याने निवृत्तीची घोषणा केली आहे. मरेने स्पष्ट केले की, आगामी पॅरिस ऑलिम्पिक ही त्याच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असणार आहे. 37 वर्षीय मरे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात सामील होणार आहे. मरेने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, पॅरिसमध्ये मी माझ्या कारकीर्दीतील अखेरची टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी आलो आहे. ग्रेट ब्रिटनसाठी खेळणे, हे माझ्यासाठी आत्तापर्यंतचे सर्वात अविस्मरणीय आठवडे आहेत. आता अखेरच्यावेळीही मला ग्रेट ब्रिटनकडून खेळायला मिळणे, हा मोठा सन्मान आहे. अँडी मरे पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे. सर्वात आधी तो 2008 साली बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. परंतु, त्या स्पर्धेत त्याला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावं लागले होते. पण नंतर त्याने 2012 लंडन ऑलिम्पिक आणि 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीमध्ये सुवर्ण पदक जिंकले.