। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील अपूर्ण बांधलेल्या अंगणवाडीबाबत नागरिक वारंवार तक्रारी करीत आहेत. जांभूळपाडा येथील अंगणवाडीच काम सुरू झाले असून लवकरच बालकांना हक्काची अंगणवाडी मिळेल असे चित्र आहे. कृषीवल वृत्तपत्रात अंगणवाडीबाबत वारंवार येणार्या बातम्या बघून रासळ ग्रामपंचायत हद्दीतील वावे गावातील अंगणवाडीचे कामदेखील अर्धवट असल्याचे एका सजग नागरिकाने कळविले आहे. ठेकेदार कोण आहे याची नागरिकांना कल्पना नसून याबाबत लक्ष घालण्यासाठी नागरिकांनी विनंती करण्यात आलेली आहे.
या अंगणवाडीचे काम वर्षभर प्रलंबित असल्याचे येथील एका सजग नागरिकाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, या अंगणवाडीचा ठेकेदार कोण, हा शोध घेण्याचा विषय आहे. हे काम करणारा किंवा याचे काम पाहणारा माणूस गावातलाच किंवा ओळखीचा असल्याने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येण्यास कचरत आहेत. तसेच, या अंगणवाडीचे बांधकाम करणारा ग्रामपंचायत सदस्य असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या कामासंबंधित कागदपत्रे पंचायत समितीकडे उपलब्ध होत नसल्याची बाब गटविकास अधिकार्यांनी सांगितली आहे.
तसेच, पंचायत समितीच्या माजी बांधकाम अधिकार्याच्या मुलीनेच एका अंगणवाडीच्या बांधकामाचा ठेका घेतल्याचे समोर येत आहे. तिचे लग्न झाल्यानंतर आडनाव बदलल्याने त्याचाच फायदा संबधीत बांधकामे आपल्या नातेवाईकांना मिळवून देण्यासाठी अधिकारी ठेका घेतात. या सर्व घटनांमुळे अधिकारी व लोकप्रतिनीधी यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत.







