जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. लोकसभेच्यावेळी महाविकास आघाडीनं जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. आता विधानसभा निवडणुकीतही तोच पॅटर्न राबवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप 80 टक्के निश्चित झाले असून, याची घोषणा लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पत्रकार परिषद घेऊन करण्यात येणार आहे.
लोकसभेला शिवसेना ठाकरे गटानं महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. त्या खालोखाल जागा काँग्रेस, शरद पवार गटाला सुटल्या होत्या. पण, लोकसभेतील कामगिरी पाहता विधानसभेला काँग्रेसला अधिक जागा मिळणार आहेत. काँग्रेस 119 जागा लढवेल. तर ठाकरेंची शिवसेना 86, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 75 जागांवर लढेल. लहान पक्षांना 7 जागा सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. यातील 222 जागांवर महाविकास आघाडीत एकमत झालं आहे. मुंबईतील 23 जागा ठाकरे गटाला, 8 जागा काँग्रेसला, 1 जागा समाजवादी पक्षाला सोडण्यात येणार आहे. यावर सहमती झालेली आहे. मुंबईतील 4 जागांवर तिन्ही प्रमुख पक्षांत रस्सीखेच आहे. या जागांबद्दलचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. मुस्लीमबहुल जागांवर काँग्रेस, ठाकरे गटाचा दावा आहे.