ठेकेदारावर कारवाईची मागणी
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चाणजे हद्दीतील डाऊरनगर येथील जिल्हा वार्षिक योजनेतून बांधण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अंगणवाडीबाबत ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या सदस्या किंजल कैलास भोईर यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती उरण यांच्याकडे पत्रव्यवहार करून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत चाणजे हद्दीत वॉर्ड क्र. 3, डाऊरनगर, ता. उरण, जि. रायगड येथे जिल्हा वार्षिक योजनेतून अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले आहे. या अंगणवाडीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे केले असून, या कामामध्ये जुने पाईप, जुने पत्रे, जुन्या विटा वापरण्यात आल्या आहेत. तसेच अंगणवाडीच्या शौचालयाचे काम केले असून, शौचालयाची टाकीचे बांधकाम केलेले नाही. सदर शौचालयाचे पाणी शेजारील असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत सोडले आहे. तसेच अंगणवाडीमध्ये अनेक कामे अपुरी ठेवली आहेत. याबाबतीत किंजल भोईर यांनी ठेकेदार विशाल गावंड, रा. पिरकोन यांना या अपुर्या कामाबाबत सांगितले असता, त्यांनी या सांगण्याकडे दुर्लक्ष करून अंगणवाडीचे काम आजपर्यंत अपुरे ठेवले आहे. अंगणवाडीचे काम अजून पूर्ण झाले नाही तरीसुध्दा त्यांनी काम पूर्ण झाल्याचे फलकसुध्दा लावले असून, कामाची रक्कम उचलली आहे.
काम अपूर्ण असताना काम झाल्याचे पूर्ण रक्कम काम पूर्ण होण्याच्या अगोदरच कशी दिली जाते, असा सवाल किंजल भोईर यांनी पत्रव्यवहाराद्वारे उपस्थित केला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुलांच्या जीवितास धोका आहे. तरी सदर कामाची पाहणी करावी व पुढील कामाची रक्कम देऊ नये. तसेच सदर अंगणवाडीचे काम करणार्या ठेकेदारावर कायदेशीर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी किंजल भोईर यांनी पत्रव्यवहाराद्वारे जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी ठिकाणी केली आहे. आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.