कुसुंबळे येथे आद्य शिक्षिकेला अंगणवाडी सेविकांचे अभिवादन

। कुसुंबळे । वार्ताहर ।
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग अंतर्गत चालविण्यात येणार्‍या चिखली बिटातील कुसुंबळे विभागातील अंगणवाडी सेविकांनी नुकतीच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडली.
या कार्यक्रमात टोसवाडी आदिवासीवाडी येथील अंगणवाडी मधील समीक्षा नाईक, हर्षला नाईक या लाभार्थींनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून उपस्थितांची शाबासकी मिळवली. तर सर्व अंगणवाडी सेविकांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.
यावेळी अंगणवाडी सेविका धन्यता निळकर, ललिता पाटील, प्रगती कोठेकर, नयना पाटील, कलावती पाटील, प्रगती पाटील, उज्ज्वला पाटील, जिविता पाटील यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ओवींचे गायन केले. यावेळी नयना पाटील तसेच प्रगती कोठेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर धन्यता निळकर, ललिता पाटील तसेच अंगणवाडी मदतनीस प्रगती पाटील व उज्ज्वला पाटील यांनी उपस्थितांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली.
जिविता पाटील यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची तसेच आधुनिक काळातील सावित्रीच्या लेकींना सामाजिक गरज ओळखून समाजाप्रती आपले दायित्व काय आहे याची ओळख आपल्या मार्गदर्शनात करून दिली. अंगणवाडी सेविका कुमुदिनी पाटील, वासंती पाटील, यशोदा पाटील, कविता पाटील यांचे सहकार्य लाभले.
चिखली विभागातील पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, विस्तार अधिकारी अपर्णा शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल अंगणवाडी सेविकांच्या विशेष कौतुक केले.

Exit mobile version