प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर हजारो महिलांचा धडक मोर्चा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सहा वर्षापर्यंतच्या बालकांना घडविणाऱ्या अंगणवाडी सेविका बुधवारी (दि.25) दुपारी त्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरल्या. पेंशन चालू करण्यापासून पदे भरण्यापर्यंतच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो अंगणवाडी सेविकांनी रायगड जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. काळ्या रंगाची साडी परिधान करून थाळी नाद आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात आला.
राज्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे एक लाख दहा हजार 664 अंगणवाडी केंद्र आहेत. या अंगणवाडी केंद्रात दोन लाखहून अधिक अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, बालकांना गरम ताजा आहार देणे, गरोदर, स्तनदा मातांना आहार व आरोग्याची माहिती देणे, लहानपणापासून बालकांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास साधण्यासाठी मेहनत घेणे अशा अनेक प्रकारची कामे अंगणवाडी सेविका करतात. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणीदेखील अंगणवाडी सेविकांच्यामार्फत केल्या जातात. अंगणवाडी सेविका मानधन तत्वावर काम करतात. राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकांना तृतीय श्रेणी आणि मदतनीसांना चतुर्थ श्रेणीचे वेतन देऊन त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा. लेक लाडकी, जनगणना, निवडणूक, एसआयआर सर्व्हे व इतर योजनाबाह्य कामे देऊन अंगणवाडी सेविकांना राबविले जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेला त्याग, बलिदान व समर्पणाचा विचार करून विनाविलंब ग्रॅच्युईटी देण्याचे आदेश निर्गमीत करावे. सेवानिवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी दरमहा पेन्शन योजना लागू करावी. सर्व अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश द्यावेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटूंबियांना आरोग्य सुरक्षेसाठी राज्य कामगार विमा लागू करावा. आजारपणाची भरपगारी रजा, कोरोना भत्ता देण्यात यावा. केंद्राचे साहित्य केंद्रात पोहच करावे. मातृवंदना योजनेचे भरलेले पैसे विनाविलंब सेविकांना देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या. जिल्हाधिकारी कार्यालय ते अलिबागमधील कुंटेबाग येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यावर थाळी नाद आंदोलन करण्यात आले.
