उद्घाटनाआधीच अंगणवाडीची दुरवस्था

पेटारवाडी अंगणवाडीची इमारत दोन वर्षे बंदावस्थेत

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतमधील पेटारवाडी या आदिवासी वाडीमधील बालकांसाठी अंगणवाडी इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये मागील दोन वर्षात अंगणवाडी सुरूच झाली नाही. दरम्यान, दोन वर्षे बंद असलेल्या अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाली असून त्याबद्दल कर्जत पंचायत समितीला कोणतेही सोयरसुतक नाही.

खांडस ग्रामपंचायत पेटारवाडी येथे 24 घरांची वस्ती आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असून अंगणवाडी देखील आहे. या वाडीमधील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी अंगणवाडी शाळा चालविली जाते. त्या अंगणवाडी शाळेसाठी इमारत नसल्याने तेथील अंगणवाडी सेविका यांच्या घरी अंगणवाडी भरविली जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार या ठिकाणी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम कर्जत पंचायत समितीने मंजूर केले. त्यानंतर 2021 मध्ये कर्जत पंचायत समितीकडून साडे आठ लाख खर्चून अंगणवाडी केंद्राची इमारत बांधण्यात आली असून त्या इमारतीमध्ये अद्याप अंगणवाडी हलविण्यात आलेली नाही.

दोन वर्षे बंद असलेल्या या इमारतीची आज दुरवस्था झाली आहे. इमारतीचे दरवाजे निखळले असून खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. याबद्दल कर्जत पंचायत समितीकडे चौकशी केली असता अंगणवाडी केंद्राची दुरवस्था झाली असल्याने तेथे बालकांना बसविता येत नाही. त्यामुळे अंगणवाडीकेंद्र खासगी जागेतून हलविण्यात आलेले नाही, अशी माहिती महिला बालविकास विभागाच्या विस्तार अधिकारी अनिता ढमढेरे यांनी दिली आहे. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कर्जत तालुक्यातील एका आदिवासीवाडीमधील लहान बालकांना हक्काच्या अंगणवाडी केंद्रात बसून शिक्षण घेता येत नाही.

Exit mobile version