वीजबिल न भरल्यामुळे मीटर काढले
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या दोन अंगणवाड्या गेल्या आठ महिन्यापासून अंधारात आहेत. त्या अंगणवाडी मधील विजेचे बिल भरण्यात आले नसल्याने महावितरण कंपनीकडून मीटर काढून नेण्यात आले आहेत. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतने त्या दोन्ही अंगणवाडी मधील विजेची तात्काळ सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी नेरळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य सनी चंचे यांनी केली आहे.
नेरळ गावातील कुंभारआळी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत तोडण्यात आल्याने नेरळ ग्रामपंचायतने तेथील दोन अंगणवाडीचे वर्ग छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेल्या खोल्यांमध्ये हलविले. नेरळ मधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि पाडा येथील दगडी शाळेच्या बाजूच्या खोली एक अशा दोन अंगणवाडी शाळेत गेल्या काही महिन्यांपासून अंधार आहे. तेथील अंगणवाडी सेविका यांसकडून ग्रामपंचायतकडे त्याबाबत पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून सदस्यांच्या मीटिंगमध्ये ठराव घेण्यात आला आणि नेरळ हद्दीतील सर्व अंगवाडीमध्ये नेरळ ग्रामपंचतीकडून लाईटचे बिल भरण्यात येईल असा ठराव पारित केला आहे.
परंतु, आता गेल्या 7 ते 8 महिने झाले या दोन अंगणवाडी शाळेचे लाईट बिल भरले नसल्याने महावितरण कंपनीने मीटर काढून नेले आहेत. तरी ग्रामपंचतीने लवकरात लवकर वीज जोडणी करण्यात यावी अशी मागणी नेरळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य सनी चंचे यांनी केली आहे.