संतप्त नागरिक नगरपंचायत कार्यालयावर धडकले

पाणीपुरवठा सभापती, मुख्याधिकाऱ्यांना घेराव

| सुधागड-पाली | वार्ताहर |

वारंवार तुटणाऱ्या जल वाहिन्या, नादुरुस्त मोटार पंप व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे गुरुवारी सततच्या पाणीटंचाईने बेजार झालेल्या संतप्त नागरिकांनी पाली नगरपंचायत कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. यावेळी पाणीपुरवठा सभापती व मुख्याधिकाऱ्यांना घेराव देखील घालण्यात आला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होते.

यावेळी आलेल्या आंदोलनकर्त्यांना नगराध्यक्ष यांच्या पतीने बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे येथील परिस्थिती अधिक चिघळली आणि आंदोलनकर्त्या नागरिकांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. पालीकरांना अंबा नदीतून पाणी पुरवठा करण्यात येतो. अंबा नदी जवळील जॅकवेलमधून पंपाद्वारे पाणी सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते. तेथून पाली नगरपंचायत हद्दीत पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी थेट नदीतून पाणी मोटारीने ओढून सोडले जाते. हे मोटार पंप 24 तास चालू असल्याने एखादा पंप नेहमी बिघडतो. अशावेळी पंप दुरुस्तीसाठी काही दिवस जातात आणि काही ठिकाणी पाणी टंचाई येते. तसेच कमकुवत जलवाहिन्या वारंवार तुटतात परिणामी त्या दुरुस्तीला खूप वेळ जातो. त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा तुटतो. शिवाय अनेक जलवाहिन्यांना गळती लागल्याने शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सतत तक्रारी करून देखील यावर उपाययोजना होताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तांत्रिक समस्या असल्याने पालीत पाणी पुरवठा अनियमित आहे. मात्र यावर लवकर तोडगा काढण्यात येईल. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. मोर्चेकरी नागरिक असभ्य भाषेत बोलून वाद घालत होते. यावेळी तिथे असलेले माझे मित्र यांनी मध्ये येऊन त्यांना शांतता राखावी असभ्य भाषेमध्ये बोलू नये नाही, तर बाहेर जावे, असे सांगितले.

सुधीर भालेराव, पाणी पुरवठा सभापती, पाली नगरपंचायत

पाणीपुरवठा सभापतींना संतप्त नागरिकांनी घेराव घातला होता. त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. अशावेळी कोणता अनुचित प्रकार घडू नये, वाद वाढू नये व शांतता राहावी. यासाठी नागरिकांना बाहेर जाण्यास सांगितले.

सूरज शेळके, सामाजिक कार्यकर्ते, पाली
लोकांचे हाल
ज्यांच्याकडे किंवा जवळपास एखादी बोअरवेल किंवा विहिरी आहे त्यांना तेथून पाणी भरावे लागते. मात्र या दोन्हींची सोय जिथे नाही तेथील नागरीकांची मात्र गैरसोय होत आहे. त्यांना दुरवरुन पाणी आणावे लागत आहे, तर कधी विकतचे पाणी आणावे लागते. पालीकर व भाविकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे.
शुद्ध पाणी योजना ही 1974 साली मंजूर झाली आहे. सद्यस्थितीत पालीकरांसाठी जवळपास 27 कोटिंची शुद्ध पाणी पुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजुनही शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मागील वर्षी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तत्कालीन मंत्री यांनी शुद्धपाणी योजना कार्यान्वित करू, असे आश्वासन दिले होते. पाली नगरपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे चालू वर्षात पाणीपट्टीत वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण नळधारकाला पूर्वीपेक्षा साधारण 780 रुपये जास्त नळपट्टी भरावी लागणार असल्याची चर्चा आहे.
Exit mobile version