| उरण | वार्ताहर |
केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात देशभरातील ट्रकचालकांनी पुकारलेल्या संप, आंदोलनाला जेएनपीए आणि उरणमध्ये हिंसक वळण लागले. करळफाटा-चांदनी चौक आणि द्रोणागिरी नोडमधील टीआयपीएल पार्किंगसमोर रास्ता रोको करणाऱ्या चालकांना समजवण्यास गेलेल्या पोलिसांवर या चालकांनी दगडफेक केली. यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी याबाबत उरण पोलीस ठाणे आणि न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उरण द्रोणागिरी नोडमधील हल्लाप्रकरणी 27 आंदोलक ट्रक चालकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नवा मोटार वाहन कायदा तातडीने रद्द न केल्यास आंदोलन आणखी व्यापक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातील ट्रकचालक व मालकांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. महाराष्ट्रात देखील या संपाला मोठा प्रतिसाद मिळत असून केंद्राच्या विरोधात जेएनपीए, नवी मुंबई, पनवेल यांसह विविध भागांत ट्रकचालक आक्रमक झाल्याचे दिसून आले. अपघात घडल्यानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहनचालकांना दहा लाख रुपये दंड आणि सात वर्षांची शिक्षा अशी तरतूद या नवीन कायद्यात करण्यात आली आहे. या कायद्याला ट्रकचालक व मालकांनी ठाम विरोध केला असून तो त्वरित रद्द करावा, अशी मागणी केली आहे.







