प्रशिक्षितांअभावी पशुंची हेळसांड
| महाड | वार्ताहर |
सन 2021 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर आगमन झाले होते. जवळपास तब्बल 35 वर्षांनंतर राष्ट्रपतीपदाची गरिमा असलेली व्यक्ती ही रायगडावर येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत चोख सुरक्षाव्यवस्था त्यावेळी ठेवण्यात आली होती. या सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरातील भटके श्वान आणि गुरे यांनादेखील त्यांचा दौरा पूर्ण होईपर्यंत पकडून बंदिस्त करून ठेवण्यात आले होते. अशावेळी प्रशासनाने घेतलेली खबरदारी परिस्थितीनुसार योग्य होती. या दौर्यानंतर अशा पद्धतीची जणू काही प्रथाच पडली असल्याचे आता दिसून येत आहे.
येत्या 6 आणि 20 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने गडावर अनेक महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येण्याची शक्यता असल्याने पुन्हा प्रशासनाने या परिसरातील श्वान पकडण्याचा आणि भटकी गुरे बंदिस्त करण्याचा हुकूम काढला असून, ही जबाबदारी पशुवैद्यकीय खात्यास देण्यात असल्याचे समजते आहे. वास्तविक, श्वानांना पकडण्यासाठी महानगरपालिका, नगरपरिषद ज्या पद्धतीने प्रशिक्षित श्वान पकडणार्या कर्मचार्यांचा वापर करते, त्याच धर्तीवर किल्ले रायगड परिसरातदेखील अशा पद्धतीनेच काम करणे उचित ठरले असते; परंतु याबाबतीत मात्र, प्रशासन गंभीर नसून, तोकड्या उपलब्ध पर्यायाचा वापर करीत पशुवैद्यकीय खात्यातील अधिकारी व कर्मचार्यांनाच ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यामध्ये या पशुंची आणि श्वानांची प्रचंड हेळसांड होणार असून, त्यांचा चारा तसेच खाण्यापिण्याचा व आरोग्याचा प्रश्नदेखील उद्भवणार आहे.
वास्तविक पाहता, किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा हा वर्षानुवर्षे होत आहे; परंतु आजपर्यंत कधीही अशा पद्धतीने भटके श्वान अथवा गुरे पकडण्याची गरज भासली नव्हती, मग आत्ताच हा उद्योग का? मागील राष्ट्रपती दौर्याच्या निमित्ताने आपण समजू शकतो की, मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात असते आणि त्यांचे काही सुरक्षा निकष असतात, त्या पद्धतीने कार्यवाही करावी लागते; परंतु प्रत्येक वेळी या मुक्या प्राण्यांना पकडून त्यांना डांबून ठेवण्यात काय अर्थ आहे. आजपर्यंतच्या इतिहास पाहता, किल्ले रायगडावरील कार्यक्रमादरम्यान कधीही कुठल्याही पर्यटक अथवा शिवभक्तावर श्वानांनी अथवा गुरांनी हल्ला केल्याची घटना कधीही घडलेली नाही. मग आत्ताच अशा पद्धतीची व्यवस्था करण्याची गरज काय? जर या बाबी अत्यावश्यक असतील, तर त्या ठिकाणी अत्यंत तज्ज्ञ पथकाची नियुक्ती करून कार्यक्रम संपेपर्यंत त्या पशु आणि श्वानांच्या उत्तम देखभालीची हमी प्रशासनाने घेणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे प्राण्यांच्या होणार्या बंदिस्तीवर प्राणीमित्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.