जिल्हा कार्यालयाच्या कारभाराविरोधात लढा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागात काम करणार्या पशुसंवर्धन विभागातील कर्मचार्यांची जिल्हा परिषद पशुसंवर्धन जिल्हा कार्यालयाकडून कामे वेळेत होत नाही. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पशुचिकित्सा व्यवसाय संघटना महाराष्ट्र शाखा रायगडमार्फत करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी आक्रमकतेच्या भूमिकेत असून, अधिकार्यांचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 15 जुलैला साखळी उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.
पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेच्या अनुषंगाने सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचे दहा, वीस, तीसचे आश्वासित पदोन्नती तसेच पशुधन पर्यवेक्षक पदावरून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदोन्नती याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांचे मागील एक वर्षापासून समक्ष भेटून बोलून अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेदेखील या समस्येचे गार्हाणे मांडण्यात आल आहेत. अनेक वेळा चर्चा करून, पत्र देऊनदेखील अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप पशुचिकित्सा व्यवसाय संघटना महाराष्ट्र शाखा रायगडच्यावतीने करण्यात आला आहे. तसेच जिल्हा कार्यालयातील कर्मचारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी सुहास कांबळे हे मयत झालेले असून, त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. त्याचा फटका कुटुंबियांना बसत आहे. या जिल्हा कार्यालयातील कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 20 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 यांना प्रथमोपचार, खच्चीकरण, लसीकरण, कृत्रिम रेतन ही कामे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक करण्यासाठी दिले आहेत. त्याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडेे मार्गदर्शन मागितले होते. त्याबाबत अद्यापपर्यंत मार्गदर्शन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषद कार्यालयाकडून वारंवार अधिनस्त कर्मचार्यांची कामे वेळेत होऊ शकली नाहीत. जिल्हा परिषद विभागाकडून कर्मचार्यांच्या कामांबाबत वारंवार टाळाटाळ केली जिात आहे. त्याविरोधात पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी लढा पुकारणार आहेत. येत्या 15 जुलैपासून पशुसंवर्धन विभाग कार्यालयासमोर पशुचिकित्सा व्यवसाय संघटना महाराष्ट्र शाखा रायगड संघटनेमार्फत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.







