विठ्ठलवाडीत प्राणी अनाथालय सुरू

गणेश नायक प्राण्यांसाठी ठरतोय खरा नायक
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
अनाथ व वृद्ध नागरिकांसाठी ठिकठिकाणी वृद्धाश्रम व अनाथालय असतात, याचा त्यांना मोठा आधारही असतो, मात्र जखमी व वृद्ध पशु पक्षी प्राण्यांच्या जीवनाच ही मोल राखत मानवतेच्या दृष्टीकोनातून एका तरुणाने प्राणी अनाथालय सुरू केले आहे. जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड विठ्ठलवाडी इथं सात एकर जागेत या संस्थेच्या माध्यमातून गणेश नायक हा अनाथ व जखमी पाळीव प्राण्यांसाठी खरा नायक ठरत आहे. रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले गुरे, श्‍वान, मांजर व अन्य प्राणी यांच्यासमोर मृत्यू उभा असतो, त्याखेरीज त्यांच्याकडे अन्य पर्याय ही नसतो. मात्र त्यांच्या जीवनात जगण्याची उमेद हे अनाथालय जागवते. या माध्यमातून अनाथ व जखमी प्राण्यांना हक्काचे आश्रयस्थान मिळत आहे.

अशा पशु प्राण्यांना अनाथलयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. बरे झाल्यावर त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले जाते, तर वृद्ध प्राण्यांचे पालन पोषण याच ठिकाणी केले जातेय. प्राणी मात्रावरील भूतदया प्रेरणादायी ठरतेय. गुरे, कोंबड्या, बकर्‍या, कुत्रे, मांजर, डुकर आदींसाठी हे अनाथालय महत्वपूर्ण वरदान ठरत आहे.

भटके प्राणी जनावरे यांचे रस्त्यावर अपघात होतात. जखमी प्राण्यांना ते घेऊन अनाथालयात नेतो, त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या अधिवासात सोडतो व वृद्ध जनावरे प्राणी यांचे संगोपन करतो. आईने हे काम सुरू केले होते, तिचे स्वप्न होते ते काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. 12 वर्षात 18 हजार जनावरे वाचवले आहेत. आईच्या स्वप्नांना साकारण्याचे काम करीत आहे. – गणेश नायक

Exit mobile version