जनावरांची कातडी गावाच्या शिवारात

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात दामत या मुस्लिम लोकवस्तीच्या गावाच्या बाहेर शेतामध्ये जनावरांची कातडी आढळून आली आहे. दामत आणि भडवळ गावाच्या हद्दीत टाकण्यात आलेल्या जनावरांच्या कातडी बद्दल सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याबदल नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, 100हून अधिक जनावरांची कत्तल करण्यात आल्याचे उघड झाले असून, या प्रकाराने खळबळ माजली आहे.


नेरळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या दामत गावातील काही व्यक्तींवर यापूर्वी नेरळ पोलीस ठाण्यात गोवंशीय जातीच्या प्राण्यांना बेकायदेशीर डांबून ठेवणे, त्यांना क्रूरतेची वागणूक देणे तसेच त्यांची कत्तल करणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून, पोलिसांच्या अनेक टीमकडून याविरुद्ध वेगवेगळ्या वेळी कारवाई करण्यात आली आहे. नेरळ पोलीस ठाण्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुस्लिमबहुल दामत गावाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जनावरांची कातडी ओहोळाच्या कडेला असलेल्या शेतात आढळून आली आहे. याबाबत नेरळ पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी तेथे धाव घेऊन तातडीने या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी कार्यवाही सुरू केली. प्राण्यांची कत्तल करून त्यांची कातडी ही दामत आणि भडवळ गावाच्या उजव्या बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात टाकून देण्यात आली असून, त्यातून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने टाकली असल्याचा नमूद केले आहे. त्याचवेळी असा प्रकार रमजान सारख्या पवित्र महिन्यात घडला असल्याने हा विषय अधिक सेन्सिटिव्ह होऊ नये यासाठी नेरळ पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या.

सदर घटनेची माहिती नेरळ पोलीस ठाण्यास मिळताच नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस उपअधीक्षक विजय लगारे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे हे करीत आहेत.

Exit mobile version