नागोठण्याची अंकिता टके ठरली राजिपची उत्कृष्ट अभियंता

। नागोठणे । प्रतिनिधी ।

नागोठण्यातील एल.टी. कंन्स्ट्रक्शनचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष लक्ष्मण उर्फ बाळासाहेब टके यांची ज्येष्ठ कन्या तसेच रोहा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत अंकिता लक्ष्मण टके हिने रायगड जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार पटकावला आहे.

आपल्या देशातील एक महान इंजिनियर व भारतरत्न मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैया यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस अभियंता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिनाचे औचित्य साधून राजिपच्या अलिबाग येथील शिवतिर्थ इमारतीमधील ना.ना. पाटील सभागृहात संपन्न झलेल्या एका कार्यक्रमात अंकिता लक्ष्मण टके हिला राजिपचे मुख्य कार्यकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी राजिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, राजिपच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के.वाय. बारदेस्कर, ग्रामीण स्वच्छता विभागाचे अधिकारी जयवंत गायकवाड यांच्यासह राजिपचे विविध खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कु.अंकिता टके ही सुमारे दिड वर्षापूर्वीच राजिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत रोहा पंचायत समिती मध्ये शिकाऊ कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाली होती. त्यानंतर थोड्याच कालावधीत तिने आपल्या कामातून स्वतःची एक वेगळी छाप उमटविली. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना राबवितांना तिने केलेल्या कामाची दखल घेऊनच रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने अंकिता हिचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Exit mobile version