| मुंबई | प्रतिनिधी |
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी मौन आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांनी सकाळी अहिल्यानगरमधील वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाआधी त्यांनी सरकारकडून दडपशाही नव्हे, तर संवाद हवा, अशी भूमिका बॅनरच्या मार्फत स्पष्ट केली. सरकारने संवाद साधून प्रश्न सोडवायला हवेत, अशी मागणीदेखील त्यांनी केली. लोकशाहीत दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असं आवाहनदेखील केलं. यावेळी आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक स्वरुपात ‘नगरचे जंतर-मंतर’ नाव दिल्याचे जाहीर केले. अण्णा हजारे यांचं मौन आंदोलन चर्चेत आलं आहे.
अण्णा हजारे यांनी आंदोलनाला सुरुवात करण्याआधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे यांच्या डोळ्यात अश्रूदेखील आले. अण्णा हजारे यांनी आंदोलनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात सरकारच्या दडपशाहीविषयी चिंता व्यक्त केली. अण्णा हजारे यांनी म्हटलं की, ‘नीट पेपरफुटी , बेरोजगारी, भरती प्रक्रियांवरून चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हे, तर लोकभावनेचा विषय म्हणून पाहिले पाहिजे. सरकारने विद्यार्थी आणि आंदोलकांशी संवाद करावा, असं म्हणत त्यांनी लोकशाही मूल्याची आठवण करून दिली’. अण्णा हजारे यांच्या आंदोलकाकडे विरोधकांसहित विरोधकांचंही लक्ष असणार आहे.






