ओम कबड्डी प्रबोधिनीचा वर्धापन दिन उत्साहात

। मुंबई । वृत्तसंस्था ।
जीवनात कसे जगायचे ते कबड्डी या खेळाने आम्हाला शिकविले, असे भावपूर्ण उद्गार भारत श्री व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विजू पेणकर यांनी ओम कबड्डी प्रबोधिनीच्या 18व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी काढले. सनपॅरेडाईझ बिजनेस प्लाझा, 6वा मजला, कमला मिल समोर, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-400013 येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा कार्यक्रम घेता आला नव्हता. त्यामुळे क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कबड्डीने आक्रमकता दिली, तसे बचाव करण्यासही शिकविले. प्रसंगी संयम ठेवून विजयी ध्येय कसे गाठावयाचे हे देखील दाखविले. अति आत्मविश्‍वासाने वागलात तर शेवटच्या क्षणी सामना आपल्या हातून कसा निसटतो हे देखील आम्ही शिकलो, असे ते पुढे म्हणाले.

याप्रसंगी कबड्डीतील ज्येष्ठ महिला खेळाडू सुषमा चेंबूरकर (सुषमा उमेश पाटील) व लीला पाटील (लीला शशिकांत कोरगावकर) आणि ज्येष्ठ पुरुष खेळाडू सुनील डकरे व सुरेश मोरे या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तर वयोवृद्ध महान खेळाडू वसंत ढवण आणि हाडवैद्य व कबड्डी खेळाडू जगन्नाथ (मामा) वलखाडे यांना कबड्डीतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

Exit mobile version