पीएनपी नाटयगृहात वितरण सोहळा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघ चालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्रीगुरुजी यांच्या स्मरणार्थ संघाच्या जनकल्याण समितीतर्फे देश पातळीवरील पुरस्कारांसाठी आसाम राज्यातील बाथौ महासभा संघटना आणि अहमदाबाद येथील इंदूमतीताई काटदरे यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि.23 जानेवारी) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली.यावर्षी हे पुरस्कार रविवार 20 फेब्रुवारी रोजी अलिबाग मधील पीएनपी नाटयगृह येथे होणार्या कार्यक्रमात प्रदान केले जाणार आहेत. धर्मसंस्कृती व अनुसंधान या विषयांसाठी हे पुरस्कार प्रदान केले जातील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक स्व. माधव सदाशिव गोळवळकर तथा प.पू. श्रीगुरूजींच्या जन्मदिनानिमित्त पुरस्कार प्रदान केले जातात. राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती अथवा संस्थांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
राष्ट्रीय स्तरावरील या विविध 10 क्षेत्रांची 5 गटांमध्ये विभागणी केलेली असून प्रतिवर्षी एका गटातील दोन विषयांसाठी दोन पुरस्कार दिले जातात. वाङ्मय – सेवा, क्रीडा – कृषी, कला – समाजप्रबोधन, धर्मसंस्कृती – अनुसंधान आणि पर्यावरण – महिला सबलीकरण या पाच गटातींल एका गटातील प्रतिवर्षी दोन याप्रमाणे 5 वर्षात सर्व 10 विषयांचे चक्र पूर्ण होते. श्रीगुरूजी पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व गौरव चिन्ह असे असते. पुरस्कार प्रदानाचे हे 27 वे वर्ष आहे. धर्मसंस्कृती विषयाचा पुरस्कार आसाम प्रांतातील ऑल बाथौ महासभा या संघटनेस प्रदान केला जाईल. ही संघटना पूर्वांचलातील सातही प्रांतामधील 25 लक्ष लोकसंख्या असलेल्या बोडो जनजाती मधील समाजामध्ये स्वधर्म जागृती व संस्कृती संवर्धनाचे कार्य करीत आहे. अनुसंधान विषयाचा पुरस्कार श्रीमती इंदूमतीताई काटदरे यांना प्रदान केला जाईल. ज्या पुनरूत्थान विद्यापीठ कर्णावती (अहमदाबाद) गुजरातच्या कुलपती आहेत. या विद्यापीठाच्या माध्यमातून शुध्द भारतीय शिक्षण व मानवी जीवनाच्या सर्वांगांमध्ये भारतीयत्वाचा अविष्कार घडविण्याचे कार्य चालू आहे.
या पुरस्कार सोहोळ्याचे प्रमुख अतिथि म्हणून अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील सुविख्यात प्रल्हाद वामनराव पै मुंबई यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकर्ते सुरेश तथा भैय्याजी जोशींची उपस्थिती असेल. स्वागत समितीचे अध्यक्ष रघुराजे आंग्रे, अलिबाग हे आहेत. अलिबाग शहरातील कमळनागरी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण दाते, संघाचे कुलाबा जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे, कार्यवाहक रवीकिरण काळे, अविनाश धाट आदी उपस्थित होते.