। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील केवाळे येथील रामकृष्ण अॅकॅडमी इंग्रजी मिडीयम शाळेचा वार्षिक खेळ महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या अॅकॅडमीत नर्सरी ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळ प्राविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यामध्ये प्रामुख्याने धावणे, रिले, कबड्डी, क्रिकेट, गोळाफेक, थाळीफेक, रस्सीखेच अशा विविध प्रकारच्या वैयक्तीक व सांघिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
या खेळ महोत्सवाचे उद्घाटन अॅड. मनोज भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विद्याधिराज चॅरिटेबल ट्रस्टचे व्यंकटरमण भट तसेच या कार्यक्रमासाठी आलेले योगेश पै, उमा पै व प्रिया पै यांसह मुख्याध्यापक दिपक तावडे, मुख्याध्यापिका हर्षलता चिमणकर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मानवी मनोर्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी बोलताना अॅड. मनोज भुजबळ यांनी सांगितले की, यशाबरोबरच अपयश पचविण्याचे कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भावी जीवनात उंच भरारी वेगळ्या क्षेत्रात मारावी यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यासाठी आपण तयार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.