भुयारी मार्गातील वाहनांवर जलाभिषेक

पाण्याचा साठयाबाबत सर्वच अनभिज्ञ

| पोलादपूर | वार्ताहर |

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून जाणाऱ्या वाहनांवर भुगर्भातील जलाशयाचा गेल्या तीन वर्षांपासून होणाऱ्या जलाभिषेकाचा मारा अद्याप सुरू असून भुयाराच्या वरील भागातून संततधार पाण्याचा अभिषेक होत असताना कातळामध्ये कोठे व किती पाण्याचा साठा असू शकेल, याबाबत सर्वच अनभिज्ञ दिसून येत आहेत.

मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवकाळामध्ये या कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचा वापर झाल्यानंतर काही काळ भुयारी मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी भुयारामध्ये पहिल्यांदाच दोन मोटारसायकली घसरून झालेल्या अपघाताचे कारण हे कातळातून होणाऱ्या भुगर्भातील पाण्याचा जलाभिषेक असल्याचे स्पष्ट झाले होते. आंगणेवाडी यात्रेसाठी पुन्हा गेल्या आठवडयामध्ये हा भुयारी मार्ग कशेडी घाटाला पर्यायी रस्ता म्हणून सुरू करण्यात आला असता अनेक वाहनांवर भुयाराच्या वरील भागातून होणारा जलाभिषेक सुरू राहिल्याचे दिसून आले. त्यानंतर अद्याप हा भुयारी मार्ग कशेडी घाटाला पर्यायी व्यवस्था म्हणून वाहतुकीस खुला करण्यात आला असताना कातळातून संततधारेप्रमाणे रस्त्यावर कोसळणारे पाणी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवरदेखील कोसळत जलाभिषेक करीत असल्याचे दिसून येत आहे.

येत्या काळामध्ये कोकणात शिमगोत्सवानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांसाठीही कशेडी घाटाला पर्यायी भुयारीमार्ग खुला राहणार असल्याने या जलाभिषेकाची तीव्रता वाहनांमुळे भुयाराला बसणाऱ्या हादऱ्यांनी वाढल्यास कोणती आणिबाणीची परिस्थिती अचानक उदभवू शकते, याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणि एनएचएआय म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत सतर्कतापूर्वक जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Exit mobile version