जमावाला भडकावल्याचा आरोप
। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूर शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील कारवाईसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. नुकतेच नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता या प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आली आहे. फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे दहा दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्याने जमावाला भडकावले असल्याची माहिती पुढे आली आहे.
फैजान खातीब हा अकोल्यात वास्तव्यास असतो, मात्र ईदनिमित्त तो महिनाभरापूर्वी नागपुरात आपल्या मूळगावी आला होता. 17 मार्च रोजी नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. दंगलीच्या ठिकाणाच्या अनेक सीसीटीव्ही फुटेजमध्ये फैजान दिसून आला आहे. एका फुटेजमध्ये तो पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. पोलिस जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत असताना तो पोलिसांशी वाद घालत होता.
यापूर्वी नागपूर हिंसाचार प्रकरणात कथित सूत्रधार फहिम खान आणि त्याचा कथित गुरू हमीद इंजिनिअर यांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, फैजान खातीब ही या प्रकरणातील तिसरी मोठी अटक मानली जात आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र अजूनही सुरूच आहे.