अजित पवारांना आणखी एक धक्का

मामेभावाच्या पुण्यातील घरावर ईडीचा छापा
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीने पुन्हा छापेमारी केली आहे. अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. जगदीश सध्या दौंड शुगरचे संचालक आहेत. दौंड शुगर्स, जरंडेश्‍वर साखर कारखाना यांदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्यांवरील कारवाईमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याआधी आलेगाव दौंड येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्यात प्राप्तीकर विभागाने सात ऑक्टोबर रोजी शोधमोहीम सुरू केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मोहिमेंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) चे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते. त्यावेळी जगदीश कदम यांची प्राप्तीकर विभागाने पुणे येथे चौकशी केली होती. तर, वीरधवल जगदाळे यांच्याकडे कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत कारखान्याचे व्यवहार व करविषयक चौकशी केली होती.

Exit mobile version